आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशोकथा: नाशिकची ‘सौरभ’ झळाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयआयटीसारख्या अवघड अभ्यासक्रमात म्हसरूळ येथीलसौरभ सूर्यवंशीने सुवर्णपदक पटकावून नाशिकचे शिक्षण क्षेत्र उजळून टाकले आहे. शेतकरी कुटुंबातील सौरभने नॅनो टेक्नॉलॉजी सोलर सेट्स (सौरउर्जेवर आधारित उपकरण) या विषयावर केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये दखल घेण्यात आली आहे.

नाशिकरोडच्या चलार्थ पत्र मुद्रणालयातील सहायक मुख्य अभियंता विनायक यशवंत सूर्यवंशी यांचा मुलगा असलेल्या सौरभचा आयआयटी, मुंबईच्या पवई संकुलात 51 व्या दीक्षांत समारंभात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदकाने गौरव करण्यात आला. या समारंभात 2044 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. टाटा कन्सल्टन्सीचे उपाध्यक्ष एस. रामादोराई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी आयआयटीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संचालक देवांग खक्कर उपस्थित होते.

‘जेईई’ या आयआयटीसाठीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या शंभरात आलेल्या 67 विद्यार्थ्यांनी मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला असून पहिल्या दहापैकी आठजण याच आयआयटीत आले आहेत. देशभरात दबदबा असलेल्या पवई आयआयटीत सौरभने अभ्यासाबरोबरच सामाजिक सेवा, विविध स्पर्धा, योग्य वर्तणूक अशा सर्वच घटकात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने तो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरला.


यशस्वी वाटचाल
सौरभचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पंचवटीतील ए. बी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. आर. वाय. के. सायन्स महाविद्यालयातून बारावीला 91 टक्के गुण प्राप्त करणारा सौरभ 2008 मध्ये एआय ट्रिपल ई परीक्षेमध्ये देशात 26 व्या आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पाच वर्षांच्या बी. टेक. आणि एम. टेक. च्या पदव्युत्तर पदवी परीक्षेतही तो टॉपर होता.


सॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश
आयआयटीतून एम. टेक. झालेल्या सौरभने मास्टर इन सायन्स (एम. एस.) करण्यासाठी कॅलिफोर्नियातील (अमेरिका) सॅनफोर्ड या नामांकित विद्यापीठाची प्रवेश परीक्षा (जीआरई) दिली. या परीक्षेत दोन विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित तो टॉपर राहिला असून त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. पुढील आठवड्यात तो अमेरिकेस रवाना होणार आहे.

महिंद्राकडून शिष्यवृत्ती
सॅनफोर्ड या जगभरात प्रसिद्ध असलेल्या नामांकित विद्यापीठात शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागणार असल्याने त्याने महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा व केशुब महिंद्रा यांनी त्याची मुलाखत घेत गौरव केला. त्याचबरोबर, कंपनीकडून दोन लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली.


वडिलांचे स्वप्न पूर्ण
‘आयआयटी’त इंजिनीअर व्हायचे वडिलांचे स्वप्न होते. मात्र, आर्थिक परिस्थिती व योग्य सुविधांअभावी ते शक्य न झाल्याने त्यांना अभियांत्रिकी पदविकेवर समाधान मानावे लागले. हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याचा आनंद आहे. मलादेखील आयआयटीत यशस्वी होईन की नाही, अशी धास्ती सुरुवातीला वाटत होती. मात्र, आई-वडील, शिक्षकांचे मार्गदर्शन व अथक पर्शिमामुळे यशस्वी झालो. केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. सौरभ सूर्यवंशी

आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन सादर
सौर ऊर्जा उपकरणांच्या उत्पादन खर्चात होत असलेली वाढ लक्षात घेत सौरभने ‘नॅनो टेक्नॉलॉजी सोलर सेट्स’ या प्रणालीबाबत संशोधन केले. अशा प्रकारची उपकरणे तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याचा केवळ दहा टक्के वापर करून अद्यावत, आधुनिक उपकरण तयार केले जाऊ शकते. त्याच्या यासंदर्भातील पेपरची आंतरराष्ट्रीय र्जनलसाठी निवड झाली आहे.