आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाच्या त्रासाला वैतागून लग्नाच्या आदल्या दिवशी त्याने केला जीवनाचा शेवट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रविवारी (दि. 2) विवाहबंधनात अडकून सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्‍या शिलापूर येथील एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत जीवनाचा शेवट केल्याने त्याच्या आप्त व मित्रांना धक्काच बसला. एका महिला पोलिस कर्मचार्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याच्याजवळील चिठ्ठीत आढळल्याने या महिलेसह तिची बहीण, आई व मानलेल्या भावाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक सावकार बर्वे (वय 30) या तरुणावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार, ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी मनीषा व्यंकन्ना कुजरे हिच्याशी वर्षभरापूर्वी सायकल रेसच्या वेळी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मनीषा त्याच्याकडे पैशांची मागणी करीत असे. तो रेल्वेमध्ये गॅँगमन म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर मनीषाने त्याला लग्न करण्याची गळ घातली. ते मान्य नसेल तर तीन लाख रुपये दे; अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी मनीषासह तिच्या बहिणी कल्पना व सुनीता, आई लीला, मानलेला भाऊ रवी पुजारी आणि वहिनी यांनी दिली होती. तसेच फोनवरून मनीषाच्या सहकारी ज्योती गोसावी, स्वाती जगताप, सारिका जाधव यांनीदेखील खोट्या केसमध्ये अडकवण्याचे धमकावत तीन लाखांची मागणी केली होती. याबाबत दीपकने आई व मामांना कल्पनाही दिली होती. ‘बदनामी नको’ म्हणून दीड लाख रुपयांवर तडजोड झाली होती. मात्र, या प्रकरणामुळे व्यथित होऊन शुक्रवारी सायंकाळी अंगाला हळद लागल्यानंतर मध्यरात्री त्याने ओढा, शिलापूर परिसरात रेल्वे रुळावर गाडीखाली आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री कुजरे, तिची बहीण कल्पना, आई लीलाबाई व मानलेला भाऊ रवी यांना अटक करण्यात आली. उपनिरीक्षक जमीर नाईक तपास करत आहेत.

मगच मृतदेह ताब्यात
दीपकच्या नातेवाइकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांनी तसे आश्वासन दिल्याने मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

आज होता विवाह
मृत दीपकच्या अंगाला लावलेली हळद ओलीच होती. रविवारी नाशिकरोड येथे दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर त्याचा विवाह होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याने जीवनाचा अंत केल्याने सारेच हळहळत होते.