आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुला फेस्ट’मध्‍ये वाइनची धूम, तरुणाई झूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाइन कल्चरमध्ये थिरकणारी तरुणाई. मनाला धुंद करणार्‍या संगीताच्या तालावर बेभानपणे सुरू असलेले डान्स अशा जल्लोषात देशाच्या वाइन कॅपिटल अर्थातच नाशिकमध्ये ‘सुला फेस्ट’ला रविवारी सुरुवात झाली.

या उत्सवात तब्बल साडेसात हजारांवर देशी-विदेशी पर्यटकांनी हजेरी लावत मनसोक्त आनंद लुटला. यामुळे नाशिकच्या व्यावसायिक उलाढालीला दमदार हातभार लागला. यानिमित्ताने वाइन व्हॅलीची कीर्ती सर्वदूर पोहोचण्यात मदत झाली असल्याने विविध अंगांनी हा महोत्सव उत्तरोतर रंगतदार ठरू पाहात आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग आणि क्रशिंगचा सिझन सुरू होतो. यामुळे पुढील तीन महिने वाइन पर्यटनासाठी आणि त्या अनुषंगाने होणार्‍या कोट्यवधींच्या उलाढालीकरिता महत्त्वाची ठरतात. या काळात विविध वाइनरीजकडून वाइन महोत्सवांचे आयोजन केले जाते. गेल्या सात वर्षांपासून ‘सुला फेस्ट’चे आयोजन केले जात असून, या महोत्सवाची सुरुवातही सुलानेच केली आहे. विनियार्ड्समध्ये या पध्दतीने आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या फेस्टला फक्त तीनशे पर्यटकांची उपस्थिती होती; मात्र यावर्षी सुरू झालेल्या फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी साडेसात हजारांच्या आसपास पर्यटकांनी उपस्थिती लावत यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

‘सुला फेस्ट’ची वाढती लोकप्रियता
सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी साडेचार हजार परदेशी पर्यटक आले. यामध्ये 50 टक्के पर्यटक प्रथमच सहभागी झाले. यावरून या फेस्टची लोकप्रियता ध्यानात येते. देशी-विदेशी कलाकारांनी सादर केलेले संगीत, हिंदी-इंग्रजी गाण्यांचे फ्युजन, तीन स्टेज यामुळे पर्यटकांना आनंद लुटता आला. येथे स्पेन, फ्रान्स, हॉलंड, युके या देशांसह बंगळुरू, पुणे, मुंबई, औरंगाबाद, भोपाळ या शहरांतून मोठय़ा संख्येने पर्यटक सहभागी झाले आहेत. - डॉ. नीरज अग्रवाल, उपाध्यक्ष, सुला वाइन

म्युझिक, डान्स आणि वाइन
महोत्सवात पहिल्याच दिवशी बाबा रॉबिज्न डी. जे., ग्लोरीला डान्सर, वेरामोडा फॅशन शो अशा आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल होती. मदमस्त म्युझिक, डान्स आणि आवडीची वाइन सोबत लज्जतदार फूडची मनसोक्त मजा पर्यटकांनी दिवसभर येथे चाखत महोत्सवाची मजा लुटली.

10 टक्के विदेशी पर्यटक
या महोत्सवात यंदा किमान दहा टक्के विदेशी पर्यटकांनी उपस्थिती लावली, त्यात रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, मलेशिया या देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. यंदा विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय देशातील पुणे, बंगळुरू, मुंबई आदी शहरांतून पर्यटक आले असून, शहरातील हॉटेल्स यामुळे हाउसफुल्ल आहेत.

सामाजिक संस्थाही सहभागी
गेल्या सात वर्षांत यंदा प्रथमच सुला फेस्टमध्ये अनेक सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. तसेच प्राण्यांसाठी काम करणारी ‘शरण’, ‘आय मेक अ डिफरन्स’ यांसारख्या सामाजिक काम करणार्‍या एनजीओंनाही सहभागी करून घेण्यात आले होते. मुंबईस्थित मेट्टा ही अंध व्यक्तींसाठी काम करणारी संस्थाही सहभागी झाली आहे. पर्यटकांना अंध व्यक्तींच्या हातून फूट मसाज थेरपी दिली जात असून, त्याला पर्यटकांची अधिक पसंती मिळते आहे. यामुळे अंध व्यक्तींना व्यवसायही मिळत असून, त्यांना या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे संस्थेच्या संस्थापिका जोनिता यांनी सांगितले.

अधिक छायाचित्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...