नाशिक -वेगवेगळे देश, प्रदेश, जाती, धर्म, पंथ आणि भाषा यांना जोडणारा दुवा म्हणजे संगीत. म्हणूनच संपूर्ण जगात आज विविध संगीत महोत्सव साजरे होतात आणि त्यांना जगभरातील संगीतप्रेमी हजेरी लावतात. साधारण दशकापूर्वी नाशिकमध्ये सुरू झालेल्या सुला फेस्टिव्हलमध्ये देशी-परदेशी रसिक संगीताच्या सुरांत तल्लीन होतात... नाशिकची ही एक नवी अाेळखच झाली अाहे.
या फेस्टिव्हल्सना लोकप्रियतेसोबतच टीकेलाही सामोरे जावे लागलेले आहे. काही संस्कृतीच्या ठेकेदारांनी वादंगदेखील निर्माण केले. वस्तुत:, असे कार्यक्रम जागतिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिक अर्थकारणाला हातभार लावतात त्या स्थळाची ओळख जगभरात करून देण्यास मदत करतात. त्यासोबतच, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलाकारांना
आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ देतात. आपल्या शहरात संपूर्ण जगाची संगीत संस्कृती आणतात. अशा कार्यक्रमांमध्ये पर्यटकांना संगीतासोबतच जागतिक खाद्यसंस्कृतीचीही अाेळख हाेते. त्यामुळे सोबतीला मद्य, वाइन किंवा ज्युसेस ओघाने आलेच. यासोबत इतर कलाकुसरीच्या वस्तूही स्थानिक किंवा बाहेरील कलाकारांना आर्थिक फायदा आणि प्रसिद्धी मिळवून देतात. यासारख्या कार्यक्रमात अल्पवयीनांना मद्यापासून दूर ठेवण्यासाठी आयोजक नक्कीच प्रयत्न करतात. कारण, तसे केल्यास या कार्यक्रमांची मान्यता आणि एकंदरीतच प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. शिवाय, प्रचंड आर्थिक नुकसान पदरी पडू शकते, याचे भान व्यावसायिकांना असतेच.
फेस्टिव्हलचा हा मोठा पसारा सांभाळताना कार्यक्रमाला बेशिस्त आणि स्वैराचाराचे गालबोट लागू नये आणि पर्यटक संगीतप्रेमींना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. फेस्ट कायद्याच्या चौकटीतच राहून केला जाईल, याची खात्री करून शासनाच्या विविध विभागांकडून परवानगी देण्यात येते. कायदा-सुव्यवस्था बाधित होणार नाही यासाठी बाउन्सर्स, सिक्युरिटी गार्ड्स, स्वयंसेवक यांची मोठी फौज राबत असते. याद्वारे रोजगाराची मोठी संधी निर्माण होते. साधारणत: येथे गायले किंवा वाजवले जाणारे संगीत नाचगाण्याच्या स्वरूपाचे नव्हे, तर विविध देशांतील वैशिष्ट्यपूर्ण संगीत पद्धतींचे सादरीकरण असल्याने त्याचा आवाज कर्णकर्कश नसून, कर्णमधुर आणि योग्य डेसिबल्समध्येच असतो. त्यामुळे नागरिक किंवा पशुपक्ष्यांना काहीही त्रास होत नाही. हजारो संगीतप्रेमींची वाहने पार्क करण्याकरिता मोठी व्यवस्था आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थाही केली जाते.
अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरातील व्यवसायांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. हजारो पर्यटक भेट देत असल्याने शहरातील सर्व लहान-मोठी हॉटेल्स साधारण महिनाभर आधीच बुक होतात. अशा फेस्टिव्हल्सचा प्रचार आणि प्रसार जगभर होत असल्याने पर्यटक आणि संगीतप्रेमी अशा शहरांना भेट देण्यास उत्सुक असतात. अनेक ब्लॉगर्स आणि व्हिडिओ ब्लॉगर्स अशा शहरांची सफर इंटरनेटवर प्रसिद्ध करतात. त्यामुळे केवळ फेस्टच्या काळातच नव्हे तर वर्षभर कला पर्यटक शहराला भेट द्यायला येत असल्याचा अनुभव अाहे.
अगदी २५० लोकांच्या उपस्थितीने सुरू झालेला सुला फेस्ट आज दहा हजारांपेक्षाही अधिक लोकांची उपस्थिती पाहतो अाहे. त्याची लोकप्रियता वर्षागणिक वाढत असल्याने यावर्षी सुला फेस्ट दोन दिवसांऐवजी तीन दिवस साजरा करायचे ठरवले गेले आहे. यावर्षी सुला फेस्ट ३, फेब्रुवारीला हाेणार अाहे.
दरवर्षी वेळेचे बंधन पाळत कार्यक्रम दुपारी १२ वाजता सुरू होऊन रात्री दहा वाजता थांबवला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा १२ पासून सुरू होतो. सुलाच्या भोवती असणाऱ्या जमिनींच्या मालकांशी बोलून या काळासाठी मोठी, मोकळी माळरानं भाडेतत्त्वावर घेतली जातात. यामुळे पाहुण्यांच्या वाहनांची सोय तर होतेच, शिवाय जमीनमालकांना रिकाम्या जमिनीच्या वापराचा माेबदला मिळताे.
संगीत स्वत:च एक संस्कृती आहे आणि त्याला देश-विदेशाच्या मर्यादा नाहीत. यातून सुला फेस्टने ‘सुला फेस्ट संस्कृती’ निर्माण केलीय. जीवनशैलीमध्ये सामावून घेतो ते सर्व व्यवहार म्हणजे संस्कृती. बैलगाडीकडून संगणकाकडे जातानाच्या आपल्या प्रवासात आपल्याला जे हवे ते आपण घेतले, आणि जे नको ते आपोआपच कालौघात विरून गेले. त्यात भारतीय संस्कृती मुळातच सर्वसमावेशक असल्याने जे उत्तम ते घेणे, जे नको ते सोडणे हे आपण करू, यात शंका नाही.