आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखासाठी जावयाने केला सासू आणि भाच्याचा निर्घृण खून, सासरा थोडक्‍यात बचावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत मंदाबाई खराटे व नैतिक लिलके - Divya Marathi
मृत मंदाबाई खराटे व नैतिक लिलके
नाशिक - आर्थिक वादातून जावयाने सासू आणि आठ वर्षांच्या भाच्याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. सासूला आठ ते दहा तरुणांनी अडवले असल्याचे सांगत त्याच ठिकाणी घेऊन जात सासऱ्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दोन बोटे तुटूनही प्रतिकार केल्याने सासऱ्याचे प्राण वाचले. गुरुवारी (दि. १३) दुपारी १२ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी जखमी दशरथ सोनू खराटे (वय ६०, रा. गंधारवाडी, मखमलाबाद) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन क्रमांकाच्या मुलीवर त्र्यंबकरोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांनी त्यांचा चार क्रमांकाचा जावई मोतीराम बदादे (रा. तळेनगर, पंचवटी) यास पत्नी मंदाबाई खराटे (५५) हिच्यासोबत मखमलाबाद येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी पाठवले हाेते. मंदाबाई यांच्यासाेबत कोचरगाव येथील नातू नैतिक विश्वास लिलके (८) हाही गेला होता. जावयाने बँकेतून पैसे काढले. चोपडा लॉन्स पुलावर सासूला काहीतरी बतावणी करत निर्जनस्थळी नेले. तेथे काेयत्याने वार करत सासू आणि नैतिक लिलके याचा निर्घृण खून केला.

काही वेळाने त्र्यंबकरोडवरील हॉस्पिटलमध्ये येऊन सासूला आठ ते दहा मुलांनी अडवले असल्याचे सांगत सासऱ्याला दुचाकीवर बसवून घटनास्थळी नेले. रस्त्याने पायी जात असताना सासऱ्यास संशय आला. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यावर रक्ताचे डाग दिसल्याने सासरे सतर्क झाले. संशयिताने कमरेला खोचलेला कोयता काढून सासऱ्याच्या डोक्यावर वार केला. दुसरा वार सासऱ्यांनी हातावर घेत बचाव केला. झटापट करत वाचण्याचा प्रयत्न केला. उजव्या हाताचे दोन बोटे तुटल्याने ते खाली पडले. संशयित जावयाने त्यांच्या मानेला कोयता लावून मारण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र, सासऱ्याने संशयिताचे गुप्तांग दाबत त्यास बाजूला करत कोयता हिसकावल्याने संशयिताने पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत सासऱ्याने रस्त्यावर वाहनचालकांकडे मदत मागितली, मात्र कोणी मदत केली नाही. अखेर पायी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. जखमी खराटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संशयित दुचाकी सोडून फरार :संशयिताने घटनास्थळी हेल्मेट फेकून दुचाकीवरून पळ काढला. द्वारका परिसरात दुचाकी सोडून त्याने पलायन केले. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच तो पकडला जाईल, असा विश्वास उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केला.
 
घटनास्थळी बघ्यांची गर्दी :खुनाचा प्रकार घडल्याची बातमी पसरल्याने चोपडा लॉन्स येथे बघ्यांनी एकच गर्दी केली. वाहनचालक वाहने थांबवत काय प्रकार घडला याची माहिती घेत होते. वाहन आणि बघ्यांच्या गर्दीने रामवाडीरोडवर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक विभागाशी संपर्क साधून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पुढील स्‍लाइडवर...लाडक्‍या जावयानेच केला घात...
बातम्या आणखी आहेत...