आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुंदरनारायण’ होणार आता अधिक सुंदर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमधील सर्वाधिक पुरातन मंदिरांपैकी एक म्हणून गणल्या जाणार्‍या सुंदरनारायण मंदिराच्या जतनासाठी एक कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्याने या आर्थिक वर्षात सुंदरनारायण मंदिराच्या जतनाच्या कामात प्रगती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या मंदिराचे नक्षीकाम हे नाशिकमधील पुरातन मंदिरांमध्ये सर्वोत्तम मानले जाते. मंदिराच्या कळसाच्या काही भागाची रया जाणे, दगड जागेवरून निखळण्याच्या घटनांनी मंदिराच्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या जतनासाठी पाठपुराव्यानंतर एक कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली.

257 वर्षांची पुरातन वास्तू : सरदार यशवंत चंद्रचुड (विद्यमान निवृत्त न्यायमूर्ती चंद्रचुड हे त्यांचेच वंशज) यांनी सन 1756 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. त्यासाठी 10 लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. कार्तिक महिन्याच्या वैकुंठ चतुर्दशीला होणार्‍या हरिहर भेट महोत्सवात सुंदरनारायण मंदिरातील विष्णू आणि कपालेश्वर मंदिरातील शंकराच्या भेटीचा सोहळा होतो. मंदिराची रचना अशी आहे की, दरवर्षी 21 किंवा 22 मार्च यादिवशी सूर्याचे किरण थेट मूर्तीपर्यंत पोहोचतात.

अंदाजपत्रक बाकी
सुंदरनारायण मंदिरासाठी दोन टप्प्यात एक कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप त्याबाबत आर्किटेक्टकडून अंदाजपत्रक येणे बाकी आहे. र्शीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग

सिंहस्थापूर्वी काम व्हावे
हे मंदिर अशा स्थितीत तग धरू शकणार नाही. त्यामुळे येत्या सिंहस्थापुर्वी मंदिराचे काम झाल्यास भाविकांनादेखील मंदिराचे पुनरुत्थान झाल्याचा लाभ मिळू शकेल. बाळासाहेब पुजारी, विश्वस्त, सुंदरनारायण मंदिर देवस्थान