आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Power Investment,Latest News In Divya Marathi

नाशकातही घातला दीपक पारखेने गंडा; सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीची सुरुवात शहरातूनच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या केबीसी कंपनीच्या स्थापकांमधील सदस्य तथा भाऊसाहेब चव्हाण याचा मॅनेजमेंट गुरू समजल्या जाणार्‍या दीपक पारखेने नाशकातही गंडा घातल्याची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. मुळात पारखे याने सुपर पॉवर कंपनीची स्थापना व या कंपनीचे कार्यालय 2010मध्येच नाशकात सुरू केल्याची धक्कादायक माहितीही उघडकीस आली आहे.
भाऊसाहेब चव्हाण याचा नातलग असणार्‍या पारखेने पंचवटीतील र्शीकृष्णनगर येथे कार्यालय थाटले होते. येथूनच मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या योजना त्याने सुरू केल्या होत्या. सद्यस्थितीत हे कार्यालय बंद असले तरी या ठिकाणी एका संघटनेचे बॅनर असून, याच संघटनेने केबीसी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे पोलिसांनी 80 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दीपक केदू पारखे, त्याची पत्नी दिव्या या दोघांना अटक केली आहे. पारखेच्या अटकेनंतर त्यांनी नाशकातही गंडा घातल्याचे प्रकार समोर येत आहेत. मात्र, गुंतवणूकदार त्यांचेच नातलग असल्याने अद्याप पोलिसांकडे तक्रारी करण्यास धजावत नसले तरी दोन दिवसांत ते औरंगाबाद पोलिसांकडे तक्रारी देण्यास जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दीपक पारखे व भाऊसाहेब चव्हाण यांनी नातेसंबंधातूनच डीबीसी मल्टी लेव्हल मार्केटिंग इंडिया नावाने कंपनी स्थापली होती. त्यात काही प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर केबीसीची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली. या कंपनीचे लेखापरीक्षणाचे काम करणार्‍या पारखे आणि चव्हाण यांच्यात आर्थिक वाद झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर पारखेने सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीची औरंगाबादमध्ये स्थापना केली. केबीसीच्या धर्तीवरच एजंटद्वारे गुंतवणूकदारांना दोन वर्षांत दामदुप्पट रकमेचे आमिष दाखविण्यात आले. परभणी, सेलू, परतूर, आष्टी, नागपूर, अमरावती, अकोला, लोणार भागातील शेकडो गुंतवणूकादरांकडून रक्कम गोळा केली गेली. या गुंतवणूकदारांना डिसेंबर 2013 पासून परतावा मिळणे बंद झाल्याने त्यांच्या चकरा वाढल्या होत्या. मात्र, एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात कंपनीच्या औरंगाबाद येथील कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर गुंतवणूकदार अस्वस्थ झाले होते. त्यातूनच या कार्यालयाची तोडफोडदेखील झाली होती.