आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीबाबत सर्वच याचिकांची एकत्र सुनावणी; कोर्टाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जायकवाडीत मुबलक पाणी असतानाही जलसंपदामंत्र्यांनी पाणी सोडण्यास दिलेल्या आदेशामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पाणीप्रश्न पेटला आहे. यंदाची स्थिती चांगली असतानाही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांचीही संख्या अधिक असून सर्वोच्च न्यायालयाने सर्व तक्रारींची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात करण्याचे आदेश दिल्याने आता 11 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या वेळी भीषण पाणीटंचाई होती. जायकवाडीत केवळ अडीच टक्केच पाणीसाठा होता. तीच परिस्थिती नाशिक-नगरमध्येही होती. शेती, कारखाने तर सोडाच, पिण्यासाठीच पाणी नव्हते. त्यामुळे पिण्याच्या नावाखाली नाशिक आणि नगरमधील जनतेने विशेषकरून त्यास विरोध केला नाही. परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती नाही.

जायकवाडीतही 33 टक्के म्हणजे 52 टीएमसी पाणी आहे. हे पाणी पिण्याची तहान भागवून 41 हजार हेक्टर सिंचनाच्या क्षेत्रासही पाणी पुरणार आहे. तरीही गोदावरी कालव्यांवरील धरणांतून साडेनऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिले. त्यामुळे गेल्या वर्षी पाण्याभावी जळालेल्या या दोन्ही जिल्ह्यांतील फळबागा, ऊस आणि साखर कारखान्यांना यंदाही पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे हे कारखाने पुन्हा यंदा अडचणीत येण्याची शक्यता वाढल्याने त्यांच्याकडून यंदा तीव्र विरोध होत आहे.

शिवाय औरंगाबाद आणि मुंबई अशा दोन्ही न्यायालयांत याचिका दाखल झाल्याने निकालात भिन्नता नको म्हणून, तसेच सर्वोच्च न्यायालयातही दाखल एका याचिकेच्या सुनावणीसंदर्भात आदेश देताना सर्व तक्रारींची सुनावणी एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ही सुनावणी आता 11 नोव्हेंबरला मुंबईत होईल.

दारणातील आवर्तन बंद
29 ऑक्टोबरसाठी दारणा धरणातून नगर जिल्ह्यातील विविध पाणीवापर संस्थासाठी पिण्यासाठी सोडण्यात आलेले 275 दलघनफूट पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. सलग सात दिवस पाचशे क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात आले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निश्चित आवर्तने सोडले जाण्याची शक्यता आहे.