आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक महापालिकेची; पण वेध मात्र लागले विधानसभेचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवीस वर्ष एकत्र राहिलेल्या शिवसेना भाजपच्या भांडणात आज महाराष्ट्राला वेठीस धरले गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (दि. १५) नाशिकमध्ये केली. शिवसेना-भाजपला राज्याची सत्ता झेपत नसेल तर त्यांनी खाली उतरावे, नंतर हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचा हा एकमेव मेळावा झाला. काँग्रेसचे कोणीही प्रदेश नेते नाशिकसाठी उपलब्ध होऊ शकल्याने, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही यातच हजेरी लावली. 
 
मोदींची नोटबंदी, कांद्याचे कोसळलेले भाव, जिल्ह्यात शेतकऱ्याला जाळावा लागलेला कांदा आणि शिवसेना-भाजपचे मुंबई-पुण्यात रंगलेले आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध हेच राष्ट्रवादीच्या या मेळाव्यातील विषय होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या येवला आणि निफाडमध्ये सुळेंच्या झालेल्या दोन सभा आणि नाशिकमधील एकमेव महिला मेळावा यातून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरच आपले लक्ष केंद्रित केल्याचे पुन्हा एकदा दिसून अाले. नाशिक महापालिकेसाठी आपले प्रचाराचे मुद्दे कोणते याबाबत विचारले असता रस्ते, पाणी, कचरा आणि सार्वजनिक वाहतूक हे नागरीकरणाचे सगळेच प्रश्न महत्त्वाचे असल्याचे सुळे म्हणाल्या. परंतु, संपूर्ण भाषणात त्यांचा कुठेच उल्लेख आला नाही. 

‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने नाशिकमध्ये पैसे घेऊन तिकीट वाटप केले, कांद्याला पन्नास पैसे भाव दिला आणि बचत गटांचे अनुदान लाटले यातच त्यांचा ‘डिफरन्स’ दिसून आला, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बारामतीत आंदोलने करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा शेतीप्रश्नाबाबतचा स्वाभिमान डोक्यावर लाल दिवा येतच मावळला असल्याचा टाेमणाही त्यांनी यावेळी मारला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...