आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल दिव्यासाठी घर तुटू देणार नाही; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘लाल दिवा मिळाला म्हणून थोडीच सुखात झोप येते. मुख्यमंत्रिपदापेक्षा माझ्यासाठी अजितदादाच महत्त्वाचा आहे. धोरण ठरवण्यासाठी आपली दिल्लीच बरी,’ असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीकडे सोनिया गांधी व शरद पवार हेच चेहरे असतील, असे सांगत मुख्यमंत्रिपदासाठी आताच कोणाकडेही नेतृत्व दिले जाणार नसल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित सोशल मीडीया प्रशिक्षण वर्गासाठी सुप्रिया सुळे नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांनी ‘राष्ट्रवादीचे जादा आमदार निवडून आले तर, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही दावेदार असाल की अजितदादा?’ या प्रश्न उपस्थित केला. त्यावर ‘पदामुळे अनेक घरात भांडणे झाली. एक घर कसे फुटले हे तुम्हाला माहितीय,’ असा टोला त्यांनी लगावला.

भ्रष्ट मंत्र्यांचीही पाठराखण
राष्ट्रवादीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याबाबत लक्ष वेधल्यावर सुळे यांनी त्यांची पाठराखण केली. ‘नुसते आरोप झाले म्हणून कोणी दोषी होत नाही. आरोप सिद्ध होणे महत्वाचे आहे. वीस वर्षापुर्वी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. ट्रकभर पुरावे देण्याची भाषा झाली. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. लोकांना चांगली कामे हवी असून आरोप-प्रत्यारोपाकडे ते लक्ष देत नाही,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. रेल्वे दरवाढ अन्यायकारक असून याबाबत संसदेत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेता आला असता असेही त्या म्हणाल्या.

आघाडीला चिंतनाची गरज
‘आघाडीला जनतेने का नाकारले याचे चिंतन करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे नेते त्यासाठी बैठका घेत असून केलेल्या चुका सुधारण्यासाठी मंथन सुरू आहे. काही महिला पदाधिकार्‍यांनी पदत्याग केला असला तरी, त्यांना यापुर्वी पुरेपुर संधी दिली गेली,’ असेही सुळे म्हणाल्या.

युवती काँग्रेस रामभरोसेच
विधानसभेत युवती कॉँग्रेससाठी विशिष्ठ जागा मागितल्या जाणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष हेच अंतिम निर्णय घेतील. मी जरी निमंत्रक असेल तरी, जागांचा आग्रह धरणार नाही, असे सुळे म्हणाल्या.

कोणत्याही पदापेक्षा माझा दादा महत्वाचा असून आम्ही दोघेही समाजकारणासाठी काम करीत आहोत. ब्लड इज थिकर देन वॉटर. रक्ताची नाते कधीही घट्टच असते. - सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी

(फोटो - खासदार सुप्रिया सुळे)