आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सरकारची गद्दारी, सुप्रिया सुळेंचा घणाघाती अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांद्याला भाव नाही, लोकांचे मोर्चे निघतात, पोलिसांवर हल्ले होतात, अशा वेळी मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. अहमदनगरपासून नंदुरबारपर्यंत त्यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू आहे. कांद्याला- टोमॅटोला भाव नाही, फुलांना-भाज्यांना भाव नाही आणि सरकार काहीच करत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकार शेतकरीविरोधात असल्याची टीका त्यांनी केली. अधिवेशनापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीमालाला हमी भाव मिळावा ही मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याची माहिती त्यांनी ‘दिव्य मराठी’ ला दिली. ‘आम्ही काही वेगळे मागत नाही आहोत, मोदींनी निवडणुकीआधी भाषणांमधून जाहीर केले होते, त्याप्रमाणे उत्पादन खर्चावर ५० टक्के हमी भाव द्या याची आम्ही आठवण करून देत आहोत,’ सुळे म्हणाल्या.

‘कुपोषण निर्मूलनासाठी आघाडी सरकारने सुरू केलेल्या पोषण विकास अभियानाचे युनिसेफने कौतुक केले होते. ते अभियान या सरकारने बंद केले, अनुदानाचा निधी बंद केला, सरकारने जाहिरातींवरचा खर्च कमी करावा आणि कुपोषण निर्मूलनासाठी वापरावा,’ अशी टीका त्यांनी केली. मुले मेली तर काय झालं असं म्हणणाऱ्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांना घरी पाठवा, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. कॉमेडी शोच्या कपिलबद्दल ट्विट करायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे; पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, यावर त्यांनी टीका केली.

‘लोकांचे मोर्चे निघत आहेत, आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराभोवती आदिवासी आंदोलन करीत आहेत, खाकी वर्दीवर हल्ले होत आहेत, आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार केला जातो, कुठे आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात देशातील शेतीमालाचे उत्पादन वाढले, निर्यात वाढली. पण मोदी सरकारच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, ज्यांना वाटतंय आपल्यावर अन्याय होतोय ते रस्त्यावर येत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते? आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं, दुर्दैवानं ते कोर्टात टिकलं नाही. हे सरकार कधी विचार करणार?’असा प्रश्न त्यांनी केला. मुंबईला होणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. रुग्णालयात जाऊन भुजबळांचे सांत्वन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करावा, असा टोला त्यांनी पंकजा मुंडेंचे नाव घेता लगावला.
बातम्या आणखी आहेत...