नाशिक- रामनगर (जळगाव) पोलिस ठाण्यास नियुक्तीस असलेले, परंतु सध्या निलंबित असलेले निरीक्षक अशोक सादरे (४८) यांनी शुक्रवारी रात्री नाशिकच्या पंचवटी परिसरातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगण्यात येते.
शुक्रवारी दुपारी सादरे यांची पत्नी व मुलगी बाहेर गेले होते. रात्री ८. ३० च्या सुमारास दोघी परतल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र घरातून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. त्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर सादरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पाच महिन्यांपासून सादरे निलंबित होते. खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.