नाशिक- कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये साधूग्रामची उभारणी करण्यात अाली अाहे. त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये देश- विदेशातील साधू- संत राहतात. या ठिकाणी भगवे वस्त्र परिधान करून व्रतस्थ जीवन जगणाऱ्या साधू, महंतांच्या ताेंडून ‘हाय, हाऊ अार यू, व्हाय, दे अार डुइंग ग्रुपिजम’ वगैरे इंग्रजीतील संभाषण व प्रवचन एेकून लाेक चकित हाेत अाहेत.
पंचवटीतील एका अाश्रमाजवळून गेले तर तुम्हाला फाडफाड इंग्रजी भाषेतील प्रवचन एेकायला मिळतील. गाेव्यातील स्कूल अाॅफ सेक्युलरचे फिलाेसाॅफी इंडियाचे प्रमाेटर असलेले स्वामी भाेला चैतन्य ब्रह्मचारी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची ही अनाेखी अाेळख अाहे. बदलत्या काळाची चाहूल सर्वप्रथम साधू-महंतांना लागते व त्याप्रमाणे त्यास अनुरूप बदलही करावे लागतात, असा त्यांचा दावा अाहे. केबडीवनालगतच्या अाश्रमात स्वामी भाेला चैतन्य ब्रह्मचारी महाराजांचा मुक्काम असून, येथे येणाऱ्या विविध अाखाड्यातील साधू-महंतांशी ते इंग्रजी व हिंदी या दाेन्ही भाषांमध्ये संवाद साधतात.
‘बदलत्या काळाप्रमाणे साधू-महंतांनी बदल करणे गरजेचे अाहे,’ असे स्वामी भाेला सांगतात. अतिरेकी कारवाई करणाऱ्या देशांचेही लक्ष या कुंभमेळ्याकडे अाहे. अापली सर्वात माेठी शक्ती संस्कृती असून, त्याचे जतन करणे हेच प्रत्येक देशवासीयांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वामी भाेला चैतन्य ब्रह्मचारी महाराज यांनी धर्मनिरपेक्षता या मुद्यावर अापले कार्य चालू असल्याचेही ‘दिव्य मराठी’शी बाेलताना अावर्जून सांगितले.
म्हणे, ब्रिटिश प्राध्यापकाचा अात्मा येऊन बाेलताे
अस्खलित इंग्रजी बाेलण्याचे रहस्य काय, असा सवाल केल्यानंतर महाराजांनी हे एक गूढ रहस्य असल्याचे सांगितले. त्यांनी दीर्घ श्वास घेऊन ध्यान लावले. त्यानंतर अस्खलित इंग्रजीत धडाधड प्रवचन सुरू झाले. ‘हे काेठे शिकले?’ असे विचारल्यावर त्यांनी स्मितहास्य करीत मला अात्मा वश करण्याची शक्ती अवगत असल्याचा दावा केला. अाता मी जे काही इंग्रजीत बाेललाे ते मी नसून अाॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील इंग्रजीचे दिवंगत प्रमुख एडवर्ड यांची वाणी हाेती. जेव्हा दुसरा अात्मा शरीरात प्रवेश करताे तेव्हा माझा अात्मा शरीराच्या एका कणात दडून सर्व प्रक्रिया बघत असताे, असा दावाही त्यांनी केला.