आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण पद्धतीला नवे वळण देणार ‘स्वयम‌्’, ५०० ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारत जागतिक स्तरावर डिजिटल भरारी घेत असताना, देशाच्या शिक्षणपद्धतीत महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे. याच बदलांचा एक मोठा भाग म्हणजे ‘स्वयम‌्’ उपक्रम. त्यामध्ये विविध विद्यापीठांतील तब्बल ५०० अभ्यासक्रम ऑनलाइन होणार आहेत.
येत्या एप्रिलपासून देशातील जवळजवळ सगळ्या विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. दूरशिक्षणासाठी ही गोष्ट अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत आवडली नसेल, ते विद्यार्थी भारतभरातील कोणत्याही अभ्यासक्रमास या माध्यमातून प्रवेश घेऊ शकतील. यामध्ये भारताचा इतिहास, राज्यशास्त्र यासारख्या मोठ्या अभ्यासक्रमांचाही समावेश असणार आहे. भाषा, विज्ञान, गणित, तर्कशास्त्र, संगणकशास्त्र, वाणिज्य यासारख्या सगळ्याच विषयांचा समावेश त्यात असेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे या ऑनलाइन पोर्टलची सुरुवात केली जाणार आहे. ‘स्वयम‌्’ चा अर्थ स्टडी वेब ऑफ अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अॅस्पायरिंग माइंड्स, म्हणजेच चार भिंतीमध्ये शिकण्याचा कंटाळा येणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. आवडीचे विद्यापीठ, आवडीचा अभ्यासक्रम आणि आवडीचा कालावधी निवडून हे शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी पात्रतेच्या अटी सामान्य अभ्यासक्रमाप्रमाणेच असतील. या ऑनलाइन पोर्टलमध्ये मिळणारे शिक्षण हे इतर विद्यापीठांच्या शिक्षणाच्या तुलनेत ग्राह्य धरले जाणार आहे. मुळात, या शिक्षणातून मिळणारी पदवी निवडलेल्या विद्यापीठाकडून मिळणार असल्याने त्याबद्दल शंका नाहीत. शिवाय, गुणांकन पद्धतीमध्ये या पोर्टलवर मिळणारे गुण शेवटच्या गुणपत्रिकेमध्ये एकाचवेळी दिले जाणार असल्याचेही समजते.

अशा येऊ शकतात मर्यादा..
{पारंपरिक शिक्षणाकडे पाठ फिरवली जाईल.
{ तसे झाल्यास विद्यार्थी काही अडल्यास विचारून घेतात, हे होणार नाही.
{ प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर आणि इंटरनेट उपलब्ध नसते.
{ मर्यादित भागांमध्येच या शिक्षणपद्धतीचा उपयोग होणार आहे.

‘मूक’ अभ्यासक्रमावरून सुचलेली कल्पना...
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासह अन्य काही देशांमध्ये ‘मूक’ कोर्सेस सुरू आहेत. मॉक ओपन ऑनलाइन कोर्सेस असे या कोर्सेसचे स्वरूप असते. या कोर्सेसवरून ‘स्वयम‌्’ची प्रेरणा घेतलेली आहे. या कोर्सेसचाही समावेश ‘स्वयम‌्’मध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.