आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२० दिवसांत शहरामध्ये स्वाइन फ्लूचे चार रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पावसाळा संपता-संपता शहरात रोगराईने तोंड वर काढले आहे. डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, २० दिवसांत स्वाइन फ्लूचे चार रुग्ण आढळले आहेत. शहरात धूर फवारणी नावालाच होत असल्याची नगरसेवकांची तक्रार बघता आरोग्य विभागाला बेजबाबदारपणाचा संसर्ग जडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांकडून हलगर्जीपणा होत असताना चक्क आरोग्यधिकारी ठेकेदाराचे समर्थन करीत गाड्यांची कमतरता असल्याचे कारण देताना दिसत आहेत. या विरोधात सत्ताधारी मनसे आक्रमक होतानाही दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वीच महापौर अशोक मुर्तडक यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. त्यानंतरही या विभागाला जाग आलेली नाही. गेल्या २० दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे चार रुग्ण आढळले असून, जानेवारी ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत या आजाराचे केवळ सहा रुग्ण होते. त्यातही चार रुग्ण जुलै व ऑगस्टमध्ये पावसाळ्यात आढळले होते. सप्टेंबरमध्ये चार रुग्ण आढळल्यानंतर व खुद्द महापौर मुर्तडक यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतल्यावरही यंत्रणा ढिम्मच असून, सत्ताधाऱ्यांना शहरातील आरोग्य विभागावर नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने दिसत आहे.
नगरसेवकही थकले तक्रारी करून करून...
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांची भेट घेऊन धूर फवारणी होत नसल्याची तक्रार केली होती. ठेकेदाराची माणसे कोठे फिरतात, असा सवाल करत यात सुसूत्रता आणण्याची मागणी केली होती. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
दवाखाने ओस, उपचारासाठी टाळाटाळ
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रिक्त पदांचा डोंगर उभा ठाकला आहे. येथे २७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक डॉक्टर अतिरिक्त ताणामुळे स्वेच्छानिवृत्तीच्या प्रतीक्षेत आहे. काहींनी सरकारी सेवेला रामराम ठोकून खासगी प्रॅक्टिस सुरू केली आहे. खासकरून स्टाफ नर्सची तब्बल ९८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयात शुश्रूषा करण्याची जबाबदारी नातेवाईकांवरच आली आहे. आयांची १५ पदे रिक्त असल्यामुळे मातांचेही हाल होत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची केवळ दोनच पदे असून, दोन्ही पदे रिक्त आहेत.