आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षराचा माग घेत अाराेपी जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 रेल्वेच्या स्लीपर काेच असाे की जनरलच्या डब्यातून प्रवाशांची लूटमार हाेणे, महिलांच्या गळ्यातील दागिने चाेरी, अपहरणासारख्या गंभीर गुन्हे घडत असले तरी हा प्रत्येक गुन्हा उघडकीस येताेच असे नाही. बहुतांशी गुन्ह्यात अाराेपींचा काही मागमूसच लागत नसल्याने रेल्वे पेालिस अपयशी ठरतात. मात्र, याच रेल्वे पाेलिसांनी ठरविले तर कितीही अवघड, गुंतागुंतीचा गुन्हा असला ते उघडकीस अाणू शकतात, हे अनेक वेळा सिद्ध झाले अाहे.
 
असाच एक गुन्हा काेल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या ‘एसी टू टायर’च्या डब्यात घडला. शिक्षक अामदारांच्या पैशांची बॅग महागडा माेबाइल चाेरट्याने लांबविल्याचा प्रकार समाेर अाला. विशेष म्हणजे, या गुन्ह्याच्या तपासासाठी खुद्द तत्कालीन गृहमंत्री अार. अार. पाटील यांनी पाेलिसांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या हाेत्या. 
 
मुळात एसी डब्यात गुन्हा घडणेच अशक्य असल्याने अाणि कुठलेही धाेगेदाेरे नसताना अाव्हानात्मक ठरलेला हा गुन्हा रेल्वेच्या कल्याण विभागातील सहायक निरीक्षक तथा सध्याचे मुंबईनाका पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अानंद वाघ यांनी गुन्हा उघडकीस अाणला हाेता. केवळ पैशांच्या बॅगपुरता तपास मर्यादित ठेवता अनेक गुन्हे उघडकीस अाणत त्याची व्याप्ती थेट न्यूयाॅर्कपर्यंत पाेहाेचल्याने तेथील स्वाॅफ्टवेअर कंपनीनेदेखील वाघ यांच्यासह मुंबई रेल्वे पाेलिसांचा पत्र देऊन गाैरव केला. 
 
साधारणत: २००६ मधील घटना. राज्यातील सर्वात माेठी शिक्षण संस्था म्हणून नावलाैकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अाणि शिक्षक मतदारसंघातील अामदार गजानन एेनापुरे हे संस्थेच्या कामासाठी मुंबई येथे निघाले हाेते. काेल्हापूरहून महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित टू टायरच्या डब्यातून त्यांनी प्रवास केला. त्यांच्यासाेबत संस्थेच्या कामासाठीचे लाख रुपये अाणि माेबाइल ब्रीफकेसमध्ये ठेवून डाेक्याजवळ ठेवली हाेती.
 
दादर येथे उतरण्यासाठी एेनापुरे यांनी ठाण्याच्या पुढे बर्थवरून खाली उतरले. त्याचवेळी बॅग बघितली असता ती गायब झाल्याचे लक्षात अाले. त्यांनी तातडीने गाडीतील टीसीला बाेलावून घडला प्रकार सांगितला. त्याने दादर येथे रेल्वे पाेलिसांकडे घेऊन जात रितसर तक्रार दिली. 
पाेलिसांनी प्राथमिक तपास करून ताे कल्याण रेल्वेच्या अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक वाघ यांच्याकडे साेपविण्यात अाला.
 
वाघ यांनी तातडीने माेबाइल क्रमांकावरून त्याचे काॅल डिटेल्स घेत तांत्रिक विश्लेषण शाखेकडून त्याचे लाेकेशन तपासले. मात्र, जवळपास महिना हाेऊनही काहीही माहिती मिळत नव्हती. या कालावधीत वाघ पथकाने सलग चार वेळा महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास केला. रस्त्यात कऱ्हाड, काेल्हापूरला थांबून तिथे चाैकशी केली. त्याचवेळी कराड रेल्वे पाेलिसांतही माेबाइल लॅपटाॅप चाेरीचा गुन्हा दाखल झाला हाेता. 
 
विशेष म्हणजे हा गुन्हादेखील महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच अाणि ताेही एसी टू टायरमधून चाेरीचाच झाला हाेता. तिथून पाेलिसांनी रेल्वेच्या इतर पाेलिस ठाण्यांकडे या गुन्ह्याविषयी माहिती मागवित रेकार्डवरील गुन्हेगारांची चाैकशी केली. त्यामध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, वेस्टर्नच्या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस, सिद्धेश्वर अाणि अहमदाबाद एक्स्प्रेसच्या एसी डब्यातूनच प्रवाशांचे माेबाइल, पैसे, लॅपटाॅप चाेरी झाल्याचे जवळपास १० हून अधिक गुन्हे याच कालावधीत झाल्याची माहिती हाती लागली. या गुन्ह्यांच्या दाखल तारखा अाणि रेल्वेचे मार्ग याचा संदर्भ बघता त्यामध्ये एकाच मार्गावर सलग चाेरी करता सतत मार्ग बदलून चाेरी केल्याचे लक्षात अाले. 
 
पाेलिसांनी रेल्वेचा अारक्षण तक्ता तपासण्याबराेबरच काही तिकीट तपासणीसांचीही चाैकशी केली. त्यांच्या सांगण्यावरून एसीच्या डब्यात काेणीही अनाेळखी अथवा विनातिकीट घुसूच शकत नसल्याने त्याचे नाव, पत्ता रेल्वेचा अारक्षण फार्म भरताना सापडेल. त्या दिशेने तपासाची दिशा फिरवित ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले अाहेत, त्या दिवसाच्या एसी बाेगीतील प्रत्येक प्रवाशांचे अारक्षण फार्म तपासले. हे करीत असताना केवळ एकाच रेल्वेगाडीची तपासणी करता जितके गुन्हे दाखल झाले त्या काळातील चार-चार डब्यांतील किमान २०० प्रवाशांचे असे जवळपास ते हजार प्रवाशांचे अर्ज तपासण्यात अाले. 
 
यासाठी पथक तासन‌्तास अारक्षण कार्यालयात ठाण मांडून बसले हाेते. अखेरीस एकाच हस्ताक्षरातील अर्ज पथकाच्या हाती लागले. मात्र, प्रत्येक अर्जात वेगवेगळा पत्ता, वेगवेगळी नावे अाढळून अाली. यात कधी विपुल शहा, तर काहींवर जाेशी, गुप्ता, अग्रवाल अशी नावे हाेती. परंतु, चार अर्जांवर विपुल हे नाव कायम असल्याने त्यावरच संशय बळावला.
 
या अर्जांवर पत्ता बघितला असता भाईंदरच्या एका इमारतीचे नाव समाेर अाले. पण पत्ता अपूर्ण हाेता. तरीही वाघ यांनी त्याकडे दुर्लक्ष करता हाच पुरावा धरत त्या इमारतीचा शाेध सुरू केला. त्याचवेळी सेंट्रल मुंबईच्या अारक्षण कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही हाती लागले असता त्यातूनही त्याचा पुसटसा चेहरा, पेहराव स्पष्ट हाेत हाेता. त्यावरून पाेलिसांनी फाेटाे काढून घेतला. 
 
पानटपरीवाला ठरला दिशादर्शक 
साध्यावेशात पाेलिस इमारतीचा शाेध घेत असताना गल्लीबाेळातील दुकानदार, चहा टपरीवाल्यांना फाेटाे दाखवित इमारतीचे नाव विचारले. दीड ते दाेन किलाेमीटरचा भाईंदरचा परिसर फिरूनही हाती काही लागत नव्हते. ताेच एका पानटपरीवाल्याने शरीरयष्टीवरून वाघ यांना पाेलिस अाहात का? काेणाला शाेधताय, असे अापसूकच विचारले. मात्र, दाेघा कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण वाघ यांनी जवळ जाऊन त्यास फाेटाे दाखविताच टपरीवाल्याने हा तर भामटा विपुल अाहे. 
 
मागच्या बाजूला तिसऱ्या मजल्यावर राहात असल्याचे सांगताच वाघ कर्मचाऱ्यांना अाशेचा किरण दिसू लागला. जणू काम फत्ते झाल्याचा अानंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेता. एकीकडे तपास प्रगतिपथावर असतानाच दुसरीकडे गृहमत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित विचारणा हाेत असल्याने वाघ यांनी संयम ढासळू देता तपास सुरूच ठेवला. पथक संशयित विपुलच्या घरी पाेहाेचले असता फ्लॅटला कुलूप अाढळले. 
 
साेसायटीच्या सुरक्षारक्षक इतरांना विचारल्यावर दाेन महिन्यांपूर्वीच खाेली साेडल्याचे सांगितले. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता काही कागद हाती लागले. त्यावरचे हस्ताक्षर अाणि अारक्षण अर्जावरचे हस्ताक्षरही जुळत हाेते. त्याच कागदांवरील माेबाइल क्रमांकावर काॅल करून बघितल्यास विपुल अंधेरी भागात राहात असल्याची माहिती मिळाली.
 
 दरम्यान, पाेलिसांनी त्याचा माेबाइल क्रमांकही मिळविल्याने त्याचे लाेकेशन मिळवित त्याला पकडण्यासाठी सापळा रचला असता ताे वारंवार जागा बदलत हाेता. रेल्वेच्या प्रवासात ताे सापडणे अशक्य असल्याचे बघून रात्रीच्या वेळी त्यास फाेनवर संपर्क साधला. माेबाइल विकत घेण्याचा बहाणा करीत त्याने अंधेरी भागात बाेलाविताच पाेलिसांनी त्यास पकडले. 

न्यूयाॅर्कच्या कंपनीकडून शाबासकीची थाप 
वाघ यांनी विपुल याची कसून चाैकशी करीत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २०हून अधिक माेबाइल अाणि लॅपटाॅप मिळाले. त्याचबराेबर अाणखी चार लॅपटाॅप काही माेबाइल विक्री केल्याचे जबाबात अाढळून येताच तेही हस्तगत करण्यात अाले. यात एक लॅपटाॅप वगळता इतर पाच फिर्यादी मिळाले. मात्र, एका लॅपटाॅपचे मालक मिळत नसल्याने मॅक अायडीद्वारे त्याचा शाेध सुरू केला.
 
 संशयिताने हा लॅपटाॅप फाॅरमॅट केल्याने त्यातील डाटा हाती लागत नव्हता. रेल्वे पाेलिसांनी एका संशयिताला पकडून त्याच्याकडून माेठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस अाणल्याने गृहमंत्र्यांसह सर्वांकडूनच वाघ पथकाचे अभिनंदन केले जात हाेते. त्याबद्दल विशेष बक्षीसही जाहीर झाले हाेते. तरीही वाघ यांच्या मनात त्या लॅपटाॅपविषयी संशय कायम हाेता. 
 
या मॅक अायडीद्वारे लाॅगिन केल्यावर ताे न्यूयाॅर्कच्या एका कंपनीचा पत्ता हाती लागला. त्या कंपनीशी एअर कुरिअरने संपर्क साधला. कंपनीनेही तत्काळ प्रतिसाद देत अहमदाबाद येथील कंपनीच्या व्यवस्थापकास हा लॅपटाॅप दिल्याचे सांगून सविस्तर माहिती वाघ यांना मेल अाणि माेबाइलवर दिली. एवढेच नव्हे तर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास लावल्याबद्दल प्रशस्तिपत्र मेलद्वारे पाठविले. तर संबंधित व्यवस्थापकाने मुंबई गाठून मुंबई पाेलिस दल रेल्वे पाेलिसांचे विशेष काैतुकही केले. 
 
संवेदनशील कवी मनाचा पाेलिस 
सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या अानंद वाघ यांना कुठलीही शिक्षणाची अथवा पाेलिस अधिकाऱ्याची पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर एकेक पायरी सर केली अाहे. दुसऱ्या शेतात राबवून शिक्षण पूर्ण केले.
 
एमपीएसीद्वारे पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षक झालेल्या वाघ यांनी मागे वळून बघितले नाही. त्यांनी एम.एस्सी. (फिजिक्स)पाठाेपाठ एमबीए, एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. पाेलिस दलात दाखल झाल्यावरही शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या यशस्वी वाटचालीत अशिक्षित असलेल्या त्यांच्या माताेश्रींचे याेगदान महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचा संघर्ष त्यांनी ‘मायबाेली’ या कवितासंग्रहातून मांडला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...