आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमाशा कलेची विवंचना रोखण्याची गरज - आशुतोष घोरपडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तमाशा या कलेला टिकवून ठेवायचे असल्यास संबंधित कलावंतांचा योग्य सन्मान झाला पाहिजे, तसेच या लोककलेच्या वाट्याला आलेली विवंचना रोखली जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले.


लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि शाहीर अमर शेख अध्यासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने आज मुक्त विद्यापीठात तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे वित्त अधिकारी पंडित गवळी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घोरपडे बोलत होते. तमाशा या लोककलेला उज्‍जवल परंपरा लाभली असून, या कलाप्रकाराला वेगळी अशी ओळख न मिळाल्याने समाजात या कलाप्रकाराविषयी चुकीचा दृष्टिकोन असल्याचेही घोरपडे यांनी नमूद केले. या लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण हा घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे सांगतानाच या कलेच्या संवर्धनासाठी शासनाबरोबरच जनतेची साथ मिळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.


शिबिराचे सह संचालक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी प्रास्ताविक व स्वागतपर मनोगतात शिबिराची रूपरेषा आणि उद्देश विशद केला. शिबिर संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी गण-गौळण सादरीकरणासह बतावणीचा परिचय करून देताना तमाशा कलेचा इतिहास उलगडवून सांगितला. या वेळी व्यासपीठावर तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव, विद्यापीठाचे वित्त अधिकारी पंडित गवळी, प्रा. मोनिका ठक्कर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. विजयकुमार पाईकराव हे उपस्थित होते. शिबिरात राज्यातील नांदेड, रायगड, पनवेल, मुंबई, कोल्हापूर आणि नाशिक येथील एकूण 20 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.