आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श विद्यार्थी घडवणारी शिक्षिका दुर्दैवाच्या फे-यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ओळख निवृत्त शिक्षिका... अध्यापन कारकीर्द आदर्श अन् यशस्वी... पण सध्या स्मृतिभ्रंशामुळे वणवण फिरण्याची आलेली वेळ... अशा स्थितीत सापडलेल्या ‘त्यांना’ नाशिकमधील त्यांचे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधून जेऊ घालतात, उपचार करायचा प्रयत्न करतात...! नॅशनल उर्दू हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका मंदाकिनी उजागरे यांची ही दर्दभरी कहाणी.

उजागरे इंग्रजी, हिंदी, मराठी शिकवत. दोन महिन्यांपूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांना स्मृतिभ्रंश आजार जडला. काही दिवसांपासून त्या शहरात फिरून भीक मागून पोट भरत आहेत. रस्त्यावर पडलेल्या स्थितीत काही लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या तेथूनही निघून गेल्या. आठवडाभरापूर्वी त्यांचे विद्यार्थी ए. के. खान यांना उजागरे गोल्फ क्लब मैदानाजवळ दिसल्या. उजागरे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात आले. परिचयातील शहाजा खलील पटेल व अफसर खान यांना खान यांनी ही परिस्थिती सांगितली. त्या सर्वांनी त्यांचा शोध घेत त्यांना मानसिक आधार देत जेवण-उपचाराची सोय केली. अविवाहित असणाºया शिक्षिका उजागरे यांचे वडील लष्करी सेवेत, तर आई कन्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना दोन बहिणी असून एका बहिणीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. दुसरी नगरला राहते.

पेन्शनचे पैसे अडकले
उजागरे यांना निवृत्तीवेतन मिळत होते मात्र दोन वर्षांपासून सेवापुस्तिका व इतर कागदपत्रे हरवली. स्मृतीभ्रंश झाल्यामुळे त्या बँकेतही गेल्या नाहीत. वारस नसल्याने पैशावर कोणी हक्कही सांगू शकत नाही. पैसे मिळण्यासाठीही त्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे.

उत्कृष्ट गायिकाही
सप्तस्वरांची गायिका असल्याने उजागरे मॅडम यांनी त्या काळात अनेक कार्यक्रम गाजवले. आवाज अप्रतिम, उतरत्या वयातही आवाजाची धार कायम होती. कुठलेही अवघड गाणे त्या सहज गात असत. पॉलिरॉड रेकॉर्ड कंपनीत रंजना जोगळेकर आणि मंदा उजागरे यांच्या गाणे रेकॉर्ड करण्यात आले होते. संगीतकार ओपी नय्यर, रवींद्र जैन त्यांना पार्श्वगायिका म्हणून संधी देणार होते. विक्षिप्त स्वभावामुळे अनेक संधी त्यांनी सोडल्या. अंगी गुणवत्ता असूनही स्वत:ला न्याय देवू शकल्या नाहीत. ही शोकांतिका आहे. कला क्षेत्रातील लोकांनी त्यांना सहारा देण्याची गरज आहे, असे निवृत्त कार्यकारी अभियंता शरद पटवा यांनी सांगितले.


आमची जबाबदारी
उजागरे मॅडमसारख्या आदर्श शिक्षिकेच्या वाटेला आलेले दु:ख दूर करण्याची व वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी आमची आहे. लवकरच त्यांना केअर सेंटरमध्ये नेऊन उपचार करण्यात येतील.
गणेश पाटील, संस्थापक कीर्ती केअर सेंटर, नाशिक.

बहिण, भाचा येणार
मॅडमची बहीण नगरमध्ये आहे. त्यांचा भाचा वन अधिकारी आहे. ते सध्या नागपूरमध्ये आहेत. त्यांना कळवले आहे. शनिवारी ते येणार आहेत. त्यांच्या भगिनी विजया उजागरे (मिसाळ) यांनी सांभळण्याची तयारी दर्शवली.
सरोज अल्हाट, मॅडमच्या परिचित

आदर्श शिक्षिका
1980 ते 85 या काळात उजागरे मॅडम आम्हाला इंग्रजी व हिंदी शिकवत होत्या. इंग्रजी बोलण्यासह त्याचे शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, हे त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगत. त्या माझ्या आदर्श शिक्षिका आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले.
अफसर खान, अभियंता

संस्थांनी पुढे यावे
उजागरे मॅडमना सांभाळण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे. मानसिक आजारामुळे त्या एका ठिकाणी राहत नाहीत. यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. उपचाराचा खर्च करण्याची आमची तयारी आहे.
ए. के. खान, मेडिकल व्यावसायिक