आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सर्वसाधारण सभेत गुरूजींचा गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स को- ऑप. क्रेडिट सोसायटीची रविवारी झालेली विशेष सर्वसाधारण सभा गोंधळ आणि धक्काबुक्कीच्या गदारोळात पार पडली. यानंतर प्रतिसभेतही गोंधळ घालून सोसायटीच्या सभासदांनी गोंधळाची ‘परंपरा’ कायम राखली.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोसायटीची विशेष वार्षिक सभा अध्यक्ष मधुकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभापासूनच आरडाओरड आणि ध्वनिक्षेपकाचा ताबा हिसकावण्यासह विद्यमान संचालकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामध्येच सोसायटीची दिंडोरी शाखा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यमान अध्यक्षांनी जाहीर केला. शासनाने सुचविलेले आदर्श उपविधी लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रारंभी उपविधींबाबत चर्चा करायची की तोट्यात चालणारी दिंडोरी शाखा बंद करण्याचा निर्णय घ्यायचा, त्यावरूनच संचालक मंडळ आणि विरोधी गटातील सभासदांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले.

त्यानंतर सभेत कुणी उपस्थिती भत्ता जळगावप्रमाणे 400 रुपये देण्याची, तर कुणी दीर्घ मुदतीचे कर्ज पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. काही सभासदांनी देवळा शाखा सुरू करण्याची मागणी केली. संपूर्ण सभा गोंधळातच पार पडली. अध्यक्ष पवार यांनी कर्जर्मयादा पाच लाखांपर्यंत वाढविणे शक्य नसल्याचे सांगून तसे केल्यास सभासदांना कर्जासाठी वर्षापेक्षा अधिक काळ वेटिंग करावे लागणार असल्याचे नमूद केले. त्यानंतरही गोंधळच सुरू राहिल्याने राष्ट्रगीतासह सभा गुंडाळण्यात आली. या वेळी कार्यवाह ज्ञानेश्वर वडघुले, उपाध्यक्ष विठ्ठल विभूते आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
संचालकाला मारहाण

विद्यमान संचालक प्रकाश सोनवणे पायंडा मोडून ध्वनिक्षेपकावर बोलण्याचा प्रयत्न करताच दुसरे संचालक अनिल निकम यांनी त्यास आक्षेप घेत ध्वनिक्षेपक हिसकावण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी सोनवणे यांच्या सर्मथकांनीदेखील निकम यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करीत त्यांचे तोंड दाबले. या प्रकाराने संपूर्ण सभागृहातच गोंधळाचे वातावरण तयार झाले.


‘सभासदांना लाज वाटायला हवी’

सभेतील गोंधळ बघून एका युवा सभासदाने थेट अध्यक्षांच्याच हातून ध्वनिक्षेपक काढून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मी नवीन सभासद असून, पहिल्यांदाच सभेला आलो. मात्र, इतका गोंधळ घालताना सभासदांना लाज वाटायला हवी, असे त्याने सुनावले.


प्रतिसभेतही गोंधळ
विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर विद्यमान संचालक प्रकाश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिसभा घेण्यात आली. या वेळी जुन्या संचालकांकडून पाच कोटी रुपये वसूल झालेच पाहिजेत, भ्रष्टाचारी संचालक मंडळ बरखास्त करा अशा घोषणांमध्ये विद्यमान संचालक मंडळाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. तसेच सभा गुंडाळण्यात आल्याबद्दलही निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


उपविधीवर चर्चा नाहीच

शासनाने सुचविलेले आदर्श उपविधी लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात एकाही उपविधीवर या सभेत चर्चा झाली नाही. या चर्चेत उपविधींबाबत चर्चा करून त्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना एकही निर्णय झाला नसल्याने सभासदांचेच नुकसान होऊनदेखील वादातच आनंद मानणार्‍या सभासदांना त्याचेही भान उरले नव्हते.


दिंडोरी शाखा बंद करण्याचा निर्णय
दिंडोरी शाखा सुरू ठेवण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल करीत सभासदांनी शाखा बंदचा निर्णय झाल्याशिवाय उपविधीचा निर्णय न घेण्याचे जाहीर करून टाकल्याने अध्यक्ष पवार यांनी दिंडोरी शाखा बंदचा निर्णय जाहीर केला.