आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांवरील लाठीहल्ल्याचा नाशकात विराट मोर्चातून निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे या मागणीसाठी आैरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी नाशिक विभागातील हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून शनिवारी विराट मूकमोर्चा काढला. काळ्या फिती लावून शिक्षकांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष कोंडाची आव्हाड यांच्यासह शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या औरंगाबाद येथील मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला चढविला. यात अनेक शिक्षक जखमी झाले. यात महिला शिक्षकांनाही मारहाण झाली. एवढेच नव्हे तर शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विनाअनुदानित शाळांना अनुदान वाटप करून दिलासा देण्याऐवजी सरकारने केलेल्या दडपशाहीविरोधात दोन दिवसांपूर्वी खासगी संस्थांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला होता. जिल्हाभरातील ६०० हून अधिक शाळा बंद ठेवून पाच हजार शिक्षकांनी सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला. त्यानंतर शनिवारी पुन्हा शिक्षकांनी विराट मूकमोर्चा काढला. डोंगरे वसतिगृहापासून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. शिक्षक व शिक्षिकांनी हातावर काळ्या फिती लावल्या होत्या. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन मूकमोर्चा काढला. अशोकस्तंभमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली.
शिक्षकांनी दिला ठिय्या
डोंगरे वसतिगृहापासून सुरू झालेल्या विराट मूकमोर्चात चार ते पाच हजार शिक्षक व शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच शिक्षकांनी ठिय्या देत शिक्षकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध केला. त्यामुळे बराच वेळ सीबीएस ते अशोकस्तंभ या मार्गावरील एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती.

या मागण्यांनी वेधले लक्ष
विनाअनुदानित शाळांना सरसकट १०० टक्के अनुदान द्यावे, शिक्षकांवरील लाठीहल्ला केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, शिक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, संच मान्यता रद्द करावी, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तत्काळ करा, कोपर्डी प्रकरणातील दोषींना शिक्षा द्या, अशा विविध मागण्या या वेळी शिक्षकांनी हातात फलक घेऊन केल्या. निवेदनाद्वारेही या मागण्या मांडण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...