आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 हजार शिक्षकांचे रखडलेले महिन्यांचे वेतन दोन दिवसांत, अायडीबीअाय बँकेत हाेणार वेतन जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोंधळामुळे सुमारे १४ हजार पाचशे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चार महिने वेतनापासून वंचित रहावे लागले. यामुळे शिक्षकांना रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागले होते.
 
शिक्षक संघटना, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन आयडीबीआय या बँकेतून करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन २७ आणि २८ जूनदरम्यान जिल्ह्यातील १४ हजार ११९ शिक्षकांचे खाते उघडून त्यांना डेबिट कार्ड आणि पिनसह वेलकम किटचे वाटप केले.
 
जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनपासून वंचित राहिले होते. त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती. यासाठी शिक्षक संघटनांनी शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली होती. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन १४ जून २०१७ राेजी शासन निर्णय काढून शिक्षकांचे वेतन आयडीबीआय बँकेतून करण्याचे ठरविले. त्यानंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांचा २१ जून रोजी कॅम्प घेऊन जिल्ह्यातील ८५८ शाळांचे खाते उघडले. यामध्ये खाते नंबर, चेकबुक देण्यात आले. त्यानंतर २७ आणि २८ जून रोजी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे खाते उघडण्यासाठी जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात १५ कॅम्प घेऊन खाते उघडण्यात आले. आता दोन दिवसात हे खाते सुरू होणार आहे.
 
वैयक्तिक खाते लवकर उघडावे : ज्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत वैयक्तिक खाते उघडलेले नसेल तर, अशा कर्मचाऱ्यांनी नमूद केलेले कागदपत्रे घेऊन जवळच्या आयडीबीआय बँकेत संपर्क साधून लवकरात लवकर खाते उघडावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
 
शिक्षकांना आर्थिक संकटातून सावरणे शक्य
शासनाने शिक्षकांना न्याय दिला असून त्याबद्दल अाभार मानावेत तितके कमीच आहे. भविष्यातही शासनाने शिक्षकांना नेहमी सहकार्य करावे, ही अपेक्षा आहे. आता शिक्षकांना आर्थिक संकटातून सावरणे शक्य झाले आहे.
- शंकर सांगळे, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षक परिषद
 
भविष्य निर्वाह निधी कर्जासाठी खातेनंबर पे युनिटला कळवावे
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीमधून परतावा किंवा ना परतावा कर्जासाठी अर्ज दिला आहे. तो मंजूर झालेला आहे किंवा ज्यांचे सेवानिवृत्तीमुळे खाते अंतिमत: बंद करण्याचे प्रस्ताव सादर करून मंजूर झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे आयडीबीआय बँकेचे नवीन खाते नंबर शाळेच्या लेटरहेडवर त्वरित पे युनिटला कळवावे, त्यांची मंजूर झालेली रक्कम त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या नवीन खात्यावर वर्ग करता येणार असल्याचे वेतन पथकाचे प्रमुख गणेश फुलसुंदर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...