आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Technology News In Marathi, 4 G Internet Service Issue At Nashik, Divya Marathi

नाशकात पुढील वर्षी 4-जी सेवेचा प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशकात येत्या सहा महिन्यांत 50 नवीन टॉवर्सची उभारणी करून दूरसंचार जाळे अधिक भक्कम केले जाणार असून, सन 2015 अखेरपर्यंत शहरात बीएसएनएलच्या 4-जी सेवेचा प्रारंभ होईल, अशी माहिती बीएसएनएलचे राज्य महाव्यवस्थापक आनंद कुलकर्णी यांनी दिली.

एन. डी. पटेलरोडवरील कार्यालयात ‘मोबाइल गॅलरी’ या मोबाइल सेवेशी निगडित सर्व समस्यांचे निराकरण करणार्‍या दालनाचे उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘शहरात सध्या 136, तर जिल्ह्यात 156 टॉवर्स असून, त्यात लवकरच 50 टॉवर्सची वाढ करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार नवीन टॉवर्स उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यांची उभारणीदेखील 2015 पर्यंत पूर्ण होणार असल्याने कंपनीचे जाळे अधिक विस्तारून रेंज नसण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल.’

3-जी सेवेत चौथ्या क्रमांकावर : बीएसएनएलला 3-जी सेवा सुरू करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने तिच्या सुरुवातीस काहीसा विलंब झाला. मात्र, सध्या महाराष्ट्रात बीएसएनएलची ही सेवा खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आहे. पुढील आर्थिक वर्ष बीएसएनएलचे ‘मोबाइल सेवा गुणवत्ता सुधार वर्ष’ म्हणूनच घोषित करण्यात आले असून, त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू झाल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

600 कोटींच्या तोट्याकडून 200 कोटींच्या नफ्याकडे..
राज्य स्तरावर बीएसएनएल दोन वर्षांपूर्वी 600 कोटी रुपयांच्या तोट्यात होती. तो कमी होऊन गतवर्षी 300 कोटी रुपये झाला, तर यंदा फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात बीएसएनएलला सुमारे 200 कोटींहून अधिक नफा झाला असल्याचेही कुलकर्णी म्हणाले. मार्चअखेरपर्यंत नफा वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘मे आय हेल्प यू’ची अभिनव सेवा
काही काळापासून असलेल्या फायबर केबलचा तुटवडा दूर झाला असून, ‘फायबर टू द होम’ अर्थात एफटीटीएचची सुविधा महानगरातील मोठय़ा प्रकल्पांना देण्यासही प्रारंभ करण्यात आल्याचे नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती यांनी सांगितले. ‘मे आय हेल्प यू’ ही अभिनव सेवा राज्यात प्रथमच नाशकात बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे नागरिकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करता येणार असल्याचेही प्रजापती म्हणाले.

डाटा ट्रान्सफरचा भन्नाट वेग
मोबाइल सेवेत केवळ व्हॉइस सेवेव्यतिरिक्त कोणताही ‘डाटा ट्रान्सफर’ करण्यासाठी लागणारी सुविधा 2-जीमध्ये (जीएसएम तंत्रज्ञान) अत्यंत कमी वेगाची होती. 3-जी सेवेअंतर्गत तिचा वेग 1 एमबीपीएस ते 3 एमबीपीएस वाढू शकला. हाच डाटा ट्रान्सफरचा वेग 4-जी (वायमॅक्स तंत्रज्ञान) सेवेअंतर्गत 30 एमबीपीएस ते 50 एमबीपीएस म्हणजेच तब्बल दसपटीहून अधिक वाढणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, मोबाइलवरून चित्रपट डाउनलोड करण्यासाठी सध्या लागणार्‍या 30 ते 40 मिनिटांऐवजी तेच काम 4-जी सुविधेमुळे केवळ 3 ते 4 मिनिटांत होऊ शकणार आहे.