आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाव्य आरक्षित जागांवर बांधकामांना मनाईच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- साधुग्रामसाठी संपादित कराव्या लागणार्‍या जागेविषयीचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर केला असून, जागेच्या मोबदल्यात द्याव्या लागणार्‍या टीडीआरविषयी विशिष्ट झोनची र्मयादा काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान, शहर विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत संभाव्य आरक्षित जागांवरील बांधकामांना परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.

आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने पंचवटीत तपोवनातील सुमारे 300 हेक्टर जागा भूसंपादित करावयाची आहे; मात्र हे संपादन करण्यासाठी पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी आणि आता सिंहस्थाच्या तोंडावर पालिकेने शासनानेच त्याची जबाबदारी घ्यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. त्यादृष्टीने आता शासनानेदेखील पालिकेला संबंधित जागा संपादित करण्यासाठी मिळकतधारकांसाठी एखादी प्रोत्साहनपर योजना राबवण्याची सूचना परिपत्रकाद्वारे मध्यंतरी केली होती. त्यानुसार पालिकेने मूळ मालकांना वाढीव स्वरूपात दीड इतका टीडीआर देण्याचा प्रस्ताव सादर करून तो महासभेवर मंजुरीसाठी सादर केला होता. त्यास सभेत नगरसेवकांनी हरकत घेत हा प्रस्ताव कोण स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित करत किमान अडीच इतका टीडीआर देण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा फेरप्रस्ताव तयार करत टीडीआर दीड इतकाच ठेवला; मात्र टीडीआर विकत घेण्यासाठी झोनची असलेली र्मयादा हटविण्यात आल्याने जमीन मालकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. मात्र त्यासाठी साडेसात आणि नऊ मीटरच्या रस्त्याची अट ठेवण्यात आली आहे. जमीन मालकांनी घेतलेल्या हरकतींबाबत विचार करुनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयुक्त संजय खंदारे यांनी दिले.

शासन मार्गदर्शनाची प्रतिक्षा : शहर विकास आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरु असल्याने संभाव्य आरक्षित जागांवर बांधकामांना परवानगी देणे थांबविले आहे. याबाबत शासनाच्या नगररचना विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविली गेली असती तर याबाबत प्रश्न निर्माण झाला नसता मात्र आता आहे त्याच विकास आराखड्यात नागरिकांकडून येणार्‍या हरकती व सुचनांनुसार योग्य ते बदल केले जाणार असल्याने पुढे काही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच परवानग्या थांबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गरजेच्या भूसंपादनाला प्राधान्य
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागेचे भूसंपादन करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात विशेषत: शहरातील रस्ते तसेच आंतर व बाह्य रिंगरोडसाठी लागणार्‍या जागेचे संपादन करुन येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण केली जातील. सिंहस्थात शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन तीन कायमस्वरुपी आणि 20 तात्पुरत्या स्वरुपातील वाहनतळे उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

ट्रॅफिक सेलकडे दुर्लक्ष
शहर वाहतुकीसंदर्भात ट्रॅिफक सेलशी संबंधित बैठका वेळेवर होत नसल्याची कबुली आयुक्तांनी देत यासंदर्भात खरी जबाबदारी ही वाहतूक शाखेची आहे. या शाखेने पालिकेला सूचना केल्यास त्याचे पालन करण्यास पालिका बांधील आहे. मात्र, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याची खरी जबाबदारी ही वाहतूक शाखेची असल्याचे त्यांनी सांगितले.