आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: परीक्षा काळात मातृछत्र हरपल्यानंतरही दाेघींनी मिळविले 90 पेक्षा अधिक गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतुजा खुळे-पाटील ही तिची अाई दिवंगत प्रा. रूपाली यांच्यासमवेत.  ईशा चाैधरी ही तिची अाई दिवंगत नीलिमा हिच्यासमवेत. - Divya Marathi
ऋतुजा खुळे-पाटील ही तिची अाई दिवंगत प्रा. रूपाली यांच्यासमवेत. ईशा चाैधरी ही तिची अाई दिवंगत नीलिमा हिच्यासमवेत.
नाशिक : शाळेत एकाच बाकावर बसणाऱ्या दाेघा मैत्रिणींचे वेगवेगळ्या अपघातात मातृछत्र हरपण्याच्या दुर्दैवी घटना मार्च महिन्यात घडल्या हाेत्या. या मुलींची दहावीची परीक्षा सुरू असतानाच या घटना घडल्याने त्या अाता पुढील पेपर कशा देतील, या धक्क्यातून सावरून त्या परीक्षेला कशा समाेऱ्या जातील याची चिंता त्यावेळी अनेकांना भेडसावत हाेती. पण, दाेघींनीही धीर एकवटून परीक्षा दिल्या अाणि दहावीत घवघवीत यशही संपादित केले. यातील ईशा चाैधरी हिला ९४.८ तर ऋतुजा खुळे हिला ९२ टक्के गुण मिळालेत. 
 
गंगापूरराेडवरील सावरकरनगरमधील सुमंगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलिमा चाैधरी यांचा जेहान सर्कल येथे मार्च महिन्यात अपघात झाला. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली हाेती. किलबिल शाळेत शिकत असलेली त्यांची मुलगी ईशाचे दहावीचे पेपर सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात हाेती. ईशा दहावीत नक्कीच ९० च्या पुढे गुण मिळवेल, असे नीलिमा चाैधरी नेहमी अापल्या मैत्रिणींना सांगत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी ईशाने दु:खाला बराेबर घेत अभ्यासही सुरू ठेवला. त्यातून तिला ९४.८ टक्के गुण मिळाले. दुसरी घटना गंगापूरराेडवरील वाघ गुरुजी शाळेजवळ घडली हाेती. या शाळेजवळील चाैफुलीवर केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रा. रूपाली खुळे पाटील यांचाही अपघाती मृत्यू झाला. त्यांची मुलगी ऋतुजा हीदेखील किलबिल शाळेत शिकत हाेती. सासूबाईंची सेवा करीत असतानाच मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या रूपाली यांच्यासाठी ऋतुजा जीव की प्राण हाेती. त्यांच्या मृत्यूनंतर मनावर दगड ठेवत ऋतुजाने अभ्यास केला अाणि दहावीत ९२ टक्के गुण मिळविलेत. 
 
वायुदलात जाऊन अाईचे स्वप्न पूर्ण करणार 
‘अाईचे अचानक निघून जाणे हा माझ्यासाठी सर्वात माेठा धक्का हाेता. माझ्यावर दु:खाचा डाेंगरच काेसळला हाेता. पण, माझ्या किलबिल शाळेच्या प्राचार्यांसह शिक्षकांनी माेठा मानसिक अाधार दिला. माझे नातेवाइक अाणि शेजाऱ्यांनीही खूप मदत केली. मैत्रिणींनी मला त्यांच्या घरी नेत त्यांच्याबराेबर अभ्यास करून घेतला. भविष्यात वायुदलात दाखल हाेऊन मला अाईचे स्वप्न पूर्ण करायचे अाहे.’ -ईशा चाैधरी 
 
आप्तांनी धीर दिल्यामुळे मी सावरू शकली 
‘अाई अशी अचानक साेडून जाईल असा कधी विचारही मनात शिवला नव्हता. अाईच्या अपघातानंतर मी पूर्णत: खचली हाेती. ‘स्वामी तिन्ही जगाचा अाईविना भिकारी’ या उक्तीचा प्रत्यय मला येत हाेता. मी चांगले गुण मिळवून पुढे डाॅक्टर व्हावे अशी अाईची इच्छा हाेती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी धीराने उभी राहिली. अर्थात त्यासाठी माझे वडील, नातेवाइक, शेजारी यांच्यासह अाप्तांनी धीर दिल्याने मी सावरू शकली.’ -ऋतुजा खुळे पाटील 
 
बातम्या आणखी आहेत...