आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार जणांना केले त्यांनी सुंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोणाचे ओठ फाटलेले, कोणाचे नाक फाटलेले, कोणाच्या भुवया चिकटलेल्या, कोणाचे हात दुभंगलेले, तर कोणाचे कान फाटलेले. त्यामुळे या रुग्णांची समाजात वावरण्याची उमेदच हरवलेली असते. सामान्य नागरिकांप्रमाणे दिसावे म्हणून या रुग्णांच्या मनात असलेले काहूर शांत करण्याचे काम नाशिकरोड भारतीय जैन संघटना गत दहा वर्षांपासून करीत आहे.
या रुग्णांच्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया करून या रुग्णांना समाजात मोकळेपणाने वावरण्यासाठी एक उमेद देत आहे. यावर्षीही ते डिसेंबरदरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचेही सहकार्य मिळत आहे.

कान, नाक, ओठ फाटलेले, चेहऱ्यावर काळे डाग, व्रण यामुळे अनेक तरुण आणि तरुणी जगण्याची उमेदच हरवून बसतात. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या नाशिकरोड येथील शाखेने अमेरिका येथील डाॅ. शरदकुमार दीक्षित यांच्या सहकार्याने २००५ पासून अशा रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्याचे सामाजिक काम हाती घेतले अाहे. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना किमान हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु, ग्रामीण आणि शहरी भागातील बहुतांश रुग्ण आर्थिक परिस्थितीने मागासलेले असतात. त्यामुळे अशा रुग्णांसाठी जैन संघटनेने पुढाकार घेऊन एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत या संघटनेने किमान दहा हजार रुग्णांवर अशा पद्धतीचे उपचार केलेले आहेत. परंतु, दोन वर्षांपूर्वी डॉ. शरदकुमार दीक्षित यांचे निधन झाले. तरीही डॉ. दीक्षित यांचे सहकारी डॉ. लाला यांच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येतो. यंदाही ते डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या शिबिरासाठी संघटनेचे सचिव ललित सुराणा (८०८७००४०८८), अध्यक्ष रोशन टाटिया(९८२३३९५९८१), संजय चोपडा, मनोज संकलेचा, मनीष शहा, प्रशांत छाजेड, अमोल संघवी, रूपेश चोपडा, योगेश भंडारी यांनी ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना या शिबिराचा लाभ कसा मिळेल, यासाठी जनजागृती करीत आहेत.

प्रवासाचीही सोय
प्रत्येकाला सुंदर दिसण्याचे स्वप्न असते. मात्र, काही कारणाने काही व्यक्तींना ते मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावर विकृती असेल, त्यांना अधिकाधिक सुंदर करण्यासाठी संघटनेच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये रुग्णांकडून पैसे घेता उलट खूपच गरजवंत रुग्णांना नेण्या-आणण्याची सोय देखील करतो. ललित सुराणा, सचिव