आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस कोर्टचा भूखंड खुला करण्याची रहिवाशांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा टेनिस असोसिएशनच्या ताब्यात असलेला डिसूझा कॉलनीतील मोकळा भूखंड महापालिकेने ताब्यात घेऊन रहिवाशांसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी महापौर अँड. यतिन वाघ यांच्याकडे केली आहे. महापालिकेची मिळकत असलेला हा भूखंड महापालिकेने 21 फेब्रुवारी 1994 मध्ये कराराद्वारे असोसिएशनला दिला होता.

महापालिका आणि असोसिएशन यांच्यात झालेल्या कराराला 31 डिसेंबर 2008 मध्ये मुदतवाढ देण्यात आली. 31 डिसेंबर 2013 रोजी ही मुदत पूर्ण होत आहे. पुन्हा मुदतवाढ न देता उद्यान तयार करून ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठी करमणुकीचे साधन उपलब्ध करून द्यावे, संस्थेकडून चालविण्यात येत असलेल्या टेनिस कोर्टसाठी सभासदांकडून मोठे शुल्क आकारले जाते. पालिकेची मिळकत असूनही तिथे कुणालाही येऊ दिले जात नाही. त्यातच डिसूझा कॉलनी भागात एकही मोकळा भूखंड नसल्याने ही जागा रहिवाशांसाठी खुली करावी, अशी मागणी रेखा नाडगौडा, सुयोग शहा, तांबे आदींनी महापौर, आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे केली आहे.

या ठिकाणी येणार्‍या सभासदांची वाहने ही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने त्याचाही त्रास कॉलनीतील रहिवाशांना सहन करावा लागतो. सकाळ व सायंकाळच्या वेळी त्यात आणखीच भर पडत असल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी जागाही उरत नाही. यामुळे हा भूखंड रहिवाशांसाठी मोकळा केला जावा. तसेच नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि छाया ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात माहिती देऊन महासभेत प्रश्न उपस्थित करण्याविषयी साकडे घालण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली.