आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात मार्च 2014 च्या परीक्षेपासून मूलभूत बदल करण्यात आले आहेत. नव्या अभ्यासक्रमावर आधारित या बदलांच्या अनुषंगाने नव्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्नांवर अधिकाधिक भर दिला जाईल.


या शैक्षणिक वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके बदलण्यात आली व या बदलानुसार प्रश्नपत्रिकांचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्रियेतून विषयाचे आकलन व्हावे, या उद्देशाने पुस्तकांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे.


बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत पूर्वी दिलेल्या उता-यावरून प्रश्न विचारले जात. त्याऐवजी आता कृतिशील प्रश्न-जसे वाक्य पूर्ण करा, योग्य शब्द निवडा, जोड्या लावा, चूक की बरोबर ओळखा अशा प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. परीक्षेच्या गुण पद्धतीत मात्र बदल झालेला नाही. प्रश्नपत्रिका 80 गुणांची असून भाषा विषयांची तोंडी परीक्षा 20 गुणांची होणार आहे.


‘रायटिंग स्किल’चे प्रश्न अवघड
विद्यार्थ्यांना पुस्तकावर आधारित प्रश्नांचा फायदा होणार आहे. प्रश्न वस्तुनिष्ठ गुण मिळवून देणारे आहेत. ‘रायटिंग स्किल’च्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते प्रश्न अवघड वाटतात. प्रश्नपत्रिकेत वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांचा समावेश केल्याने प्रश्न लक्षात घेण्यास अडचणी येऊ शकतात, असे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर वाड यांनी सांगितले.


व्याकरणाचे आव्हान
व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांसमोर आव्हान असतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे. या प्रश्नांमध्ये जाहिराती व बातम्यांवरून विद्यार्थ्यांना पत्र लिहावे लागणार आहे. याबरोबर जाहिरातींवरून वर्णने तसेच वृत्तांत लिहिण्याचे प्रश्नही असतील. या प्रकारचे बदल विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडावेत, त्यांना प्रश्नपत्रिका सोडविताना अडचणी येऊ नयेत म्हणून शालेय शिक्षकांना प्रशिक्षण तसेच शिक्षण संक्रमण मासिकातून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत.


हे झाले बदल
* नव्या प्रश्नपत्रिकेत पूर्वीच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न.
* व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये बदल.
* प्रश्नोत्तरांऐवजी मूलभूत आकलनावर भर देण्याचा प्रयत्न
* प्रश्नांचे स्वरूप पूर्वीपेक्षा लहान असल्याने गुणवाढीस फायदा.
* क्वेश्चन टॅगऐवजी टेल टॅग, ‘ई-टाइप’ऐवजी माय रिस्पॉन्ससारखे बदल.


लवकर अवलंब करावा
प्रश्नपत्रिका नव्या अभ्यासक्रमानुसार बदलल्या आहेत. त्यातील बदल विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लक्षात आल्यास ते नव्या स्वरूपाशी परिचित होतील. या स्वरूपाबद्दल संपूर्ण माहिती ‘शिक्षण संक्रमण’च्या सप्टेंबर महिन्यातील अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शिक्षकांनी त्याचे बारकाईने वाचन करणे गरजेचे आहे.
मोहन देसले, विभागीय सहसचिव, माध्यमिक-उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक