आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदिरानगर - कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम केवळ दिखावा म्हणून सुरू असल्याने काही दिवसांपासून इंदिरानगर व वडाळागाव परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. यामुळे परिसरातील बारा हजार विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुर्दैव म्हणजे, पिसाळलेल्या कुत्र्याकडून लहान मुलांना चावा घेतल्याच्या गंभीर घटना घडूनही पालिका प्रशासन ढिम्म असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
इंदिरानगर परिसरात सुमारे सात शाळा, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, यांसह मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहतात. येथील दीपालीनगर, कमोदनगर, राजीवनगर, राजीवनगर झोपडपट्टी परिसर, जॉगिंग ट्रॅक परिसर, कलानगर, मोदकेश्वर मंदिर, गजानन महाराज मंदिर, पांडवनगरी, भारतनगर, साईनाथनगर, नंदिनीनगर यांसह वडाळागाव परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रहिवासी अपार्टमेंट, वसाहतींभोवती, ही कुत्रे मोकाट फिरत असल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
या आहेत शाळा, विद्यार्थी संख्या
डेकेअर शाळा- 1300, सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळा- 1000, गुरुगोविंद सिंग-2200, केंब्रिज- 3000, स्वामी विवेकानंद शाळा- 800, शारदा विद्यामंदिर- 2008, अभिनव बाल विकास मंदिर-300, धनलक्ष्मी विद्यामंदिर-1250
दहा मुलांना चावा
काही दिवसांपूर्वी येथील मोदकेश्वर मंदिर ते बापू बंगला या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत दहा मुलांना चावा घेतल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे परिसरातील शाळकरी मुलांमध्ये कमालीची भीती असून रस्त्यांवर मोकाट फिरणार्या कुत्र्यांना पकडावे, अशी मागणी केली जात आहे.
देखावा नको, प्रभावी मोहीम राबवावी
महापालिकेची गाडी कुत्रे पकडण्यासाठी येते. त्यात काही कुत्री पकडली जातात. परंतु, काही दिवसांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाबाबत शंका उपस्थित होते. पालिकेने देखावा न करता प्रभावीपणे कारवाई करावी. अर्चना जाधव, नगरसेविका
विद्यार्थी काय म्हणतात
घरापासून ते शाळेपर्यंत जातांना रस्त्यात कुत्र्यांचा सामना करावा लागतो. पिसाळलेल्या कुत्र्याची तर फार भीती वाटते. यामुळे शाळेत जायची भीती वाटते. चारुल सोनार
शाळेच्या आवारातील कुत्र्यांना दूर नेऊन सोडले पाहिजे. जेणेकरून शाळेत जातांना सुरक्षितपणे जाता येईल. आस्था विधाते
मोकाट कुत्र्यांचा वावर खेळाच्या मैदानावर असल्याने खेळण्यासाठीही जाता येत नाही. या कुत्र्यांना पकडले पाहिजे. यश जोशी
पिसाळलेल्या कुत्र्याच्या शरीरावर जखमा असतात. त्यामुळे या कुत्र्यांची फार भीती वाटते. अर्थव देशपांडे
देखावा नको, प्रभावी मोहीम राबवावी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.