आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेव्हा धोनी मला म्हणाला, ‘वेल बोल्ड!’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रत्यक्ष बघायला मिळणेदेखील जिथे भाग्याचे मानले जाते, तिथे प्रत्यक्ष त्यांच्यासमवेत प्रॅक्टिस म्हणजे तर ‘लॉटरी’च लागल्यासारखा आनंद होता. त्यातही कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बॉलिंग टाकत असताना तो जेव्हा पूर्णपणे बीट झाला (स्टम्पिंग आऊट चान्स) त्या वेळी त्याने उच्चारलेले ‘वेल बोल्ड!’ हे उद्गार म्हणजे तर माझ्या बॉलिंगला मिळालेले सर्टिफिकेटच वाटत असल्याचे नाशिकमधील उगवता क्रिकेटपटू सत्यजित बच्छाव याने सांगितले.

भारतीय संघाबरोबर नेटमध्ये सरावाची संधी मिळाल्यानंतर तो नाशिकला आलेला असताना ‘दिव्य मराठी’शी बोलत होता. सत्यजित रणजीतसुद्धा खेळला आहे. टीम इंडियाच्या सरावासाठी बॉलर म्हणून डावखुरा फिरकीपटू सत्यजितची निवड झाली होती. त्या वेळी झालेल्या सरावसत्रात सत्यजितला कर्णधार धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या वेळी अक्षरश: अंगावर रोमांच उभे राहिल्याची भावना सत्यजितने व्यक्त केली. सुमारे तासभर चाललेल्या सरावसत्रात सर्वाधिक काळ धोनीला गोलंदाजी केली. त्यात एकदा धोनी चेंडू मारायला पुढे आला आणि पूर्णपणे बीट झाला त्या क्षणी त्याने उच्चारलेले ‘वेल बोल्ड!’


अश्विनकडून मिळाल्या टिप्स
या सरावसत्रादरम्यान फार कुणाशी बोलण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आर. अश्विनशी जेव्हा काही क्षण संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या वेळी चेंडूची ग्रीप कशी पकडायची त्याबाबत माहिती विचारली. अश्विननेदेखील कोणतेही आढेवेढे न घेता लगेच मार्गदर्शन केल्याने त्या शिबिरातील सहभागाचा खूपच फायदा झाल्याचे सत्यजितने नमूद केले.


... ते क्षण टिपता न आल्याची खंत
सरावसत्रादरम्यान भारतीय संघाबरोबर असताना आम्हाला मोबाइलदेखील आत नेण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मोबाइलच्या कॅमे-यात तरी धोनी आणि अन्य खेळाडूंसमवेतची छायाचित्रे काढून ठेवण्याची संधी हुकल्याची खंत मनात आजही असल्याचे सत्यजित म्हणाला.