आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये अर्जविक्रेत्यास मनविसेचा हिसका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘युवकांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांचा चुराडा’ या मथळ्यासह ‘दिव्य मराठी’मध्ये बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विक्रेत्याला ‘मनसे स्टाईल हिसका’ दाखवला. बेरोजगार युवकांचे अर्ज पुन्हा फाडून न फेकण्याचे सांगितल्यावरच त्याला सोडण्यात आले.
शासकीय नोकरीचे अर्ज विक्री करण्यासह संबंधित विभागाकडे पोहोचवण्यासाठी शुल्क आकारून प्रत्यक्षात ते अर्ज फाडून रद्दी म्हणून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिव्य मराठीच्या वृत्ताने उजेडात आला. होमगार्ड कार्यालयाजवळील ‘गुरुकृपा’च्या संचालकाकडून झालेल्या या प्रकाराची माहिती ग्रामीण युवकांना नसल्याने त्याच्याकडे बुधवारीही ओघ सुरू होता. मनविसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारल्यानंतर ‘पुन्हा असे कृत्य करणार नाही’ असे त्याच्याकडून कबूल करून घेतले. अजिंक्य गिते, समाधान दातीर, तुषार मटाले, अभिजीत गोसावी, शुराब देशमुख, गणेश मोरे यांच्याकडे त्याने यापूर्वी झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.
देखरेख करणारी यंत्रणाच नाही
देखरेख करणारी यंत्रणाच नसल्याचा गैरफायदा काही विक्रेते घेत आहेत. 30-40 रुपयांचा ‘पोस्टेज खर्च’ गिळंकृत करण्याच्या हव्यासापोटी असा प्रकार केला जात आहे. दररोज किमान शंभरहून अधिक अर्ज या विक्रेत्यांकडे भरून दिले जातात. ग्रामीण युवकांची अर्ज पोस्टात टाकण्याबाबतची अनभिज्ञता आणि विक्रेत्यांवर असलेला अवास्तव विश्वासच त्यांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्यास कारणीभूत ठरत आहे.