आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील औषध फवारणी पुन्हा बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या मोहिमांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात डास, माशांचा उपद्रव वाढला आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच शहरातील औषध फवारणी पुन्हा बंद झाली असून, पेस्ट कंट्रोल ठेक्याची मुदत गेल्या आठवड्यापासूनच (दि. २३) संपल्याने आता त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात असून, ठेका देण्यासंबंधी वा पालिकेतर्फे मानधनावर कर्मचारी घेण्यासंबंधी कायमस्वरूपी निर्णय प्रलंबितच आहे. शहर परिसरातील पावसाळी गटारी सफाईची कामे रखडली असून, मध्यवर्ती भागातील कचरा वेळीच उचलला जात नाही, अनियमित घंटागाड्या अादी समस्या आहेत. कागदोपत्री पुरेशा घंटागाड्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कमीच असल्याची तक्रार आहे. गोदाकाठ परिसरदेखील याला अपवाद नाही.
औषध फवारणीत निष्काळजीपणा होत असल्याने डास प्रचंड वाढून शहरात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. पेस्ट कंट्रोलसाठी महापालिकेने नेशन टेक्नो पेस्ट कंट्रोल, तसेच एस अॅण्ड आर पेस्ट कंट्रोल यांना ठेका दिला होता. मात्र, त्यांनी कामच केले नसल्याचा आरोप आहे. संबंधित ठेकेदारांच्या ठेक्याची मुदत ऑक्टोबर २०१३ मध्ये संपली. त्यानंतर त्यांना महिन्याची मुदतवाढ दिली गेली. निविदा प्रक्रिया राबविणे, तसेच नवीन ठेकेदार नियुक्तीपर्यंत धूर आणि औषध फवारणीवर परिणाम होऊ नये म्हणून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येत आहे. आता त्यास दोन वर्षे उलटली असून, अद्याप ‘योग्य ठेकेदार’ मिळालेला नाही.
मुदतवाढीने कामावर परिणामांची होतेय ओरड
गेल्या दोन वर्षांपासून एक-एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याने पेस्ट कंट्रोलच्या कामावर परिणाम होत असल्याची ओरड होत आहे. गेल्या २३ जूनला ठेक्याची मुदत संपल्यानंतर ठेकेदारास मुदतवाढ देण्याच्या हालचाली आहेत, तर आठवडाभरापासून आैषध फवारणीची कामे पूर्णपणे ठप्प आहेत.
लाखोंच्या ठेक्याऐवजी मानधनावर काम करावे
- शहरात गेल्या काही दिवसांपासून औषध फवारणीचे काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दर महिन्यास ठेकेदाराला लाखोंचा ठेका देण्याएवजी कर्मचाऱ्यांकडून मानधनावर काम करून घ्यावे.
योगेश बोडके, नागरिक