आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीअायपींसाठीचे साईदर्शन खुले केल्याने वाढले 25 काेटींचे उत्पन्न; साई संस्थानचे अध्यक्ष डाॅ. सुरेश हावरेंची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘श्री साईबाबांनी अायुष्यभर सेवेचे व्रत अंगीकारलेे. त्यांच्याच शिकवणीनुसार  गेल्या एक वर्षात साई संस्थान सेवाभिमुख करण्यास अापण प्राधान्य दिले. संस्थानच्या कारभारात आमूलाग्र बदलही घडवले. मंदिरातील व्हीअायपी दर्शन खुले करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला, तसेच संस्थानचे उत्पन्नही वर्षभरात २५ काेटी रुपयांनी वाढले,’ अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. येत्या २६ जानेवारी राेजी दिल्लीतील राजपथावर साईंच्या विचारधारेचा चित्ररथ महाराष्ट्राच्या वतीने असावा, असा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 

साई संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून एक वर्ष पूर्ण हाेत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. हावरे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘निवडीनंतर माझ्या कामकाजाचे प्राधान्य काय असावे, यावर मी विचार केला. शिर्डीत गेल्यावर सर्वप्रथम भक्तांसाठी दर्शनरांगेची परिस्थिती समजावून घेतली, तेव्हा रांगेत महिला बाळाला घेऊन तासन् तास ताटकळत असल्याचे दिसले, तर काही महिला अापल्या बाळात दुग्धपान करत असल्याचे पाहायला मिळाले. अत्यंत अवघडलेल्या अवस्थेत या महिलांना पाहून मन हेलावून गेले. त्यांच्याकरिता अाम्ही तत्काळ स्वतंत्र कक्षाची उभारणी केली.  महिला, बालके, वृद्ध व अपंगांना थेट दर्शन व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच दर्शन रांगेत भाविकांना चहा, कॉफी, पाणी देण्याची व्यवस्था केली.

अाता अर्ध्या तासात दर्शन 
साईंच्या दर्शनासाठी दररोज लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात, पूर्वी त्यांना सहा ते अाठ तास रांगेत उभे राहावे लागत हाेते. मात्र, अाता बायोमेट्रिक टाइम दर्शनाची व्यवस्था सुरू करण्यात अाली, ज्यामुळे अाज नाेंदणी केल्यानंतर अर्ध्या तासातच दर्शनाचा आनंद भाविकांना घेता येताे.

सगळेच भक्त व्हीअायपी 
पूर्वी साई मंदिरात ज्या भाविकांच्या कपाळावर गंध आहे तेच भाविक व्हीआयपी म्हणून ओळखले जात हाेते. सामान्य भाविकांनासुद्धा व्हीआयपीप्रमाणे समाधान मिळावे यासाठी दर्शन रांगेतच प्रत्येक भाविकाला चंदनाचे  गंध लावण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात अाली.

रक्तदान संकल्पना 
श्री क्षेत्र तिरुपतीला जाणारे लाखाे लाेक केसदान करतात. त्याच धर्तीवर अाम्ही  शिर्डीला रक्तदान ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यातील २५ ब्लड बँकांशी संपर्क साधून त्यांना साई संस्थानशी थेट जोडले. शिर्डीत दररोज सरासरी ५० ते ६०  हजार भाविक येतात. त्यातील एक टक्का लोकांनी रक्तदान केले तरी ही चळवळ यशस्वी होईल, दररोज किमान पाचशे भाविक रक्तदान करतील, अशी अपेक्षा आहे.

कॅन्सर रुग्णालयाचे वरदान 
साईंच्या रुग्णसेवेचा वसा संस्थान चालवत असताना ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी साई समाधी शताब्दी वर्षात शंभर बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलशी चर्चा करण्यात अाली असून त्यांच्याशी करार करून हे रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार अाहे.

साईसृष्टी व वॅक्स म्युझियम 
साईसृष्टी प्रकल्पाच्या कामाला चालना दिली अाहे. या ठिकाणी साईचरित्राचे ५३ अध्याय हे चलचित्र व दृक््श्राव्य माध्यमातून भाविकांना दिसतील. लंडनच्या तुसाँ म्युझियमच्या धर्तीवर देशातील साधू-संत, महान व्यक्तींच्या वॅक्स म्युझियमची उभारणीही करण्यात येणार अाहे.  येथे केवळ मेणाचे पुतळे नसतील, तर त्यांच्या बाजूला अायपॅड- हेडफाेन असतील, ज्याद्वारे त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनपटाची माहितीही मिळेल. विद्यार्थ्यांसाठी प्लॅनेटोरियम व सायन्स पार्कची उभारणीही करण्यात येणार अाहे. शेगावच्या धर्तीवर नव्याने सुरू करण्यात अालेल्या साईसेवक याेजनेला भाविकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत अाहे. 

अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना राेजगार देण्यासाठी पुढाकार  
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ अार्थिक मदत न देता कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे याकरिता साई संस्थानतर्फे प्रयत्न सुरू अाहेत. या कुटुंबीयांना कुक्कुटपालन, गाय, शेळी पालन, भाजीपाला, साडीचे दुकान यांसारखे राेजगार उभा करून देणार अाहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातील ६०० कुटुंबीयांना निवडून सेवाभावी संस्थांमार्फत रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 
 
शताब्दी वर्षात कार्यक्रमांची रेलचेल 
साई शताब्दी वर्षात अनेक कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येणार अाहे. जगभरातील सर्व साई मंदिरांत एकाच वेळी रक्तदान शिबिरे, साईचरित्राचे वाचन, अन्नदान यांचा समावेश असेल. साईंच्या जीवनावर अद्ययावत कलादालनाची निर्मिती, साईंच्या साहित्याची लायब्ररी उभारली जाईल. देणगीदारांना चांदीच्या साई पादुका दिल्या जातील. चांदी व सोन्याचे नाणे रिझर्व्ह बँकेने काढावे, पाेस्ट तिकीट काढण्यासाठीही पाठपुरावा सुरू अाहे.  डिसेंबर महिन्यात अांतरराष्ट्रीय संमेलन घेण्यात येईल. अमेरिकेत ८० साई मंदिरे आहेत, तेथेही लवकरच असे संमेलन घेण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...