नाशिक- राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिकमध्ये महिलांसाठी मंजूर केलेल्या महिलांच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाला जागेअभावी ग्रहण लागले असून, शालिमार चौकात असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयातील प्रस्तावित जागा उपलब्ध हाेत नसल्यामुळे आता वडाळा शिवारातील महापालिकेच्या पाच हजार चौरस फूट जागेवर रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी महापालिकेकडे जागा मागणीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठवला आहे.
संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात महिला रुग्णालयासाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी २८ ऑगस्ट २०१३ मध्ये मंजूर करण्यात आला. मात्र संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात वडाची तसेच अन्य मोठी झाडे असल्यामुळे रुग्णालयाकरिता तोडण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याबरोबरच संदर्भ सेवा रुग्णालयात अत्यंत दुर्धर आजारांचे रूग्ण येत असल्यामुळे त्यांचा संसर्ग रुग्णालयात येणाऱ्या महिलांना होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी पाठपुरावा करून वडाळा येथील महापालिकेच्या जागेत रूग्णालयात उभारण्यासाठी पत्र दिले आहे. या जागेवर यापूर्वीच दवाखाना प्रसूतिगृहाच्या जागेचेही आरक्षण आहे. त्यामुळे अशा आरक्षणाची ३७०० चौरस फूट जागा संपादित करण्याचा प्रस्ताव आता महासभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
महापालिकेलाही होणार फायदा
आरोग्य विभागाला महापालिकेने जागा दिली, तर त्या बदल्यात मोबदला मिळणार नाही. मात्र शहरासाठी मोफत रुग्णसेवेची सोय होईल. शासनाबरोबर संयुक्त करारनामा करून येथे काही व्यावसायिक कामासाठी जागा उपलब्ध झाली, तर त्यातून महसूल मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी येथे काही गाळे बांधून ते मनपाकडे घेऊन त्यातून मनपाला महसूल मिळेल.