आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटीत दहशत पसरवणाऱ्या अाठ गुंडांवर पाेलिसांचा दंडुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना पंचवटी परिसरात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी गुंडांनी हातात शस्त्रे मिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना ही बाब कळवल्यानंतर ‘खाकी’स्टाइल पाठलाग करून पाेलिसांनी भरवस्तीमध्ये या गुंडांना दिवाळीचा पोटभर ‘फराळ’ दिला. भरवस्तीमध्ये शस्त्र हातात घेऊन पोलिस यंत्रणेलाच आव्हान देण्याचा हा प्रकार घडल्याने पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून अशा कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सतीश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, गणेश शिंदे हे रिक्षातून जात असताना परिसरातील संशयित बबलू भवर, अाशुताेष चव्हाण, राहुल शिंदे, मन्ना धुमाळ, रमेश गांगुर्डे, केतन थोरात, नागेश शेलार, नदीम जहांगीर, आकाश लाटे हे संशयित एका तरुणास हॉटेल सुविधा येथे मारहाण करत होते. हा वाद सोडवण्यास शिंदे गेले असता संशयितांनी त्यांच्यावर तलवार, कोयता आणि चॉपरने वार केला त्यांचा संशयितांनी पाठलाग सुरू केला. काही सतर्क नागरिकांनी पंचवटी पोलिसांना ही बाब कळवली. काही वेळात वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे आणि पाेलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत संशयित फरार झाले होते. पोलिसांची परिसरात गस्त सुरू असताना हेच संशयित हातात पुन्हा शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब करता गजानन चौक, नागचौक, काळाराम मंदिर, सुकेणकर लेन असा सिनेस्टाइल पाठलाग करून संशयितांना पकडले. या गल्लीतील ‘भाईं’ना पोलिसांनी भरवस्तीमध्ये ‘पोटभर फराळ’ दिला. उशिरा का होईना पोलिसांनी गुंडांच्या ‘नांग्या’ ठेचल्याने नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले. गुंडांवर मुंबई स्टाइलने कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सज्ज आहेत. मात्र, न्यायव्यवस्थेच्या धोरणामुळे या पोलिस अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले आहेत. तरीदेखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही पोलिस यंत्रणेला ‘साथ’ देण्याची ग्वाही दिली. गुंडांनी घातलेल्या या हैदाेसानंतर या परिसरातील नागरिक अजूनही दहशतीच्या छायेत आहेत. परिसरात पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

चौकीतही पडसाद
गजानन चौकात पंधरा दिवसांपूर्वी पोलिस चौकीत एकावर झालेल्या हल्ल्याची घटना पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते, असे मत काही पाेलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइलने अडथळा
पंचवटी परिसरात पोलिसांकडून गुंडांवर धडाकेबाज कारवाई सुरू असताना काही महाभाग मात्र मोबाइलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. काही सुज्ञ नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठीच पोलिसांची कारवाई आहे. पोलिसांचे खच्चीकरण का करता, असे सांगून पोलिसांच्या कारवाईला समर्थन दिले.

नाग चाैक प्रकाशझोतात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव असलेल्या नागपूरमध्ये गुंडगिरीचा अालेख चढत गेल्याने हे शहर चर्चेत अाहे. तेथे अालेल्या नवीन पाेलिस अायुक्तांनी कारवाई केल्यानंतर गुन्हेगारीचा हा अालेख खाली अाला. नाशिक शहरातील गुन्हेगारीचा अालेखही उंचावला असून, एेन दिवाळीत पंचवटीतील नागचाैकात गुंडांनी शस्त्रे नाचविल्याचा प्रकार घडल्याने या चाैकाचे नाव राज्यात झळकले. नाशिक पोलिसांनी वेळीच कारवाई केली असली तरी नागपूरवर मुख्यमंत्र्यांनी जशी कृपा केली त्याप्रमाणे नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा अाहे.

यंत्रणेला अाव्हान देण्याचा प्रयत्न
पंचवटी आणि शहरात इतर ठिकाणी गुंडांकडून दहशत पसरवण्यासाठी शस्त्रांचे दर्शन घडवले जाते. हे कृत्य पोलिस यंत्रणेला आव्हान अाहे. पोलिस दलाने वेळीच या गुंडांच्या नांग्या ठेचण्यासाठी पाऊल उचलणे काळाची गरज असल्याचे नागरिकांच्या असंख्य निनावी तक्रारीनुसार स्पष्ट होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
^यंत्रणेला आव्हान देण्याचा काेणी प्रयत्न करू नये. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आहेत. नागरिकांनी अनुचित प्रकार पोलिसांना कळवावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. शांतारामअवसरे, वरिष्ठनिरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे

तत्कालीन पोलिस आयुक्तांची आठवण
शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त विष्णुदेव मिश्री, कुलवंतकुमार सरंगल आणि पाेलिस अधिकारी डी. एस. स्वामी, साहेबराव पाटील, गणेश शिंदे, बाजीराव भोसले यांनी गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी अशाच प्रकारची धडाकेबाज कारवाई केली होती. बहुतांशी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात अाली हाेती, तर एन्काउंटरमध्ये एका गुंडाचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.