नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रचंड संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार असताना शहरातील जवळपास साडेतीन हजार पथदीपांवर निव्वळ दिवे नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असल्याची खंत व्यक्त करीत स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी विद्युत विभागाला धारेवर धरले. त्यानंतर अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी तातडीने साडेतीन हजार पथदीपांवर दिवे बसवण्याची प्रक्रिया केली जाणार असून, त्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाल्यावर तत्काळ पुढील प्रक्रिया होईल, असे उत्तर दिले.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक स्थायी समिती सभेत बंद पथदीपांचा मुद्दा उपस्थित होत आहे. एलईडी बसविण्याची प्रक्रिया वादात असताना दोन वर्षांत बसविलेल्या जवळपास साडेतीन हजार खांबांवर दिवेच बसविले नसल्याच्या मुद्यावर चर्चा झाली. निव्वळ शोभेपुरत्या उभारलेल्या खांबांचा किमान सिंहस्थात तरी वापर करा लोकांना रात्रीच्या वेळी प्रकाश पुरवून सुरक्षा द्या, असा मुद्दा राहुल दिवे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रथम प्रभारी अभियंता वसंत लाडे यांनी तीन हजार पथदीपांवर दिवे बसवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर पवार यांनी दोन वर्षांपासून खांबावर दिवे नसल्याचे मान्य करीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या निधीतील काही पैसे बचत झाल्याचे सांगितले. त्यातून या खांबांवर दिवे बसविले जाणार असून, त्यासाठी सिंहस्थांच्या उच्चस्तरीय विशेषाधिकार समितीची मान्यता घेतली जाईल, असेही सांगितले.
डॉ. गेडाम यांच्याकडून वाईट वर्तणुकीची तक्रार : आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून वाईट वागणूक दिली जात असल्याची तक्रार करीत राहुल दिवे यांनी आयुक्तांच्या दबावाखाली अधिकारी कर्मचारी काम करीत असल्याचा आरोपही केला. पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी सभागृहात माठ आणल्यानंतर ही तक्रार वैयक्तिक स्वरूपात घेऊन बघून घेऊ, अशा पद्धतीने भाषा केली जात असल्याचा दावाही केला. ५० लाख रुपयांचा निधी नगरसेवकांना िदला असला, तरी त्याच्या फायली आयुक्तांकडून स्थायी समितीवर पाठविल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
..येथे ‘पाण्यासारखा’ खर्च
आडगाव शिवारात कोटी ४५ लाख ७४ हजार ७५४ रुपये खर्चून पाणी पुरविणे, पेठरोड येथे नवीन मार्केट यार्ड, निलगिरी बाग, औरंगाबाद रोड, आग्रारोड स्टेडियम येथे कोटी ३९ लाख ९४ हजार रुपये खर्चून पाणीपुरवठा करणे, दिंडोरी बाह्य वाहनतळ येथे ५४ लाख ५८ हजार रुपये खर्चून, तर पेठरोड येथील शिवरोड शिवारातील वाहनतळासाठी ६७ लाख ६२ हजार रुपये खर्चून विविध साधनांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आयुक्त अनुपस्थित, सदस्य आक्रमक...