नाशिक - भाजपच्या दाेन वर्षाच्या सत्ताकाळात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राबविलेल्या विकास याेजनांचे स्तुतीसुमने गाण्यासाठी भाजपने मध्य पश्चिम मंडलाचा मेळावा साेमवारी (दि. १३) घेतला खरा; परंतु या मेळाव्यात शिवसेनेवरच शरसंधान साधत सेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेण्यात अाला. गंगापूर धरणात पुरेसे पाणी असतानाही केवळ महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेसह विराेधकांनी राजकीय पाणीटंचाई निर्माण केल्याचा अाराेप यावेळी करण्यात अाला.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी घेतलेले विकासाचे निर्णय अाणि त्याचा भारताच्या समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम या विषयी वक्त्यांनी सविस्तर माहिती दिली. याच वेळी शिवसेनेवर टीका करण्याचीही संधी साेडली नाही.
अामदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, सत्तेची फळे चाखतानाच अामच्यावर टीका करण्याची सेनेची दुटप्पी भूमिका अाता जनतेलाही समजली अाहे. अामदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेच्या निवडणुकीत सेनेला धाेबीपछाड देण्याचे अावाहन करतानाच भाजपचे शंभरपेक्षा अधिक नगरसेवक निवडून द्यावे असे सांगितले. अामदार सीमा हिरे यांनी केंद्र सरकारच्या याेजनांचा ऊहापाेह करत या कामाच्या जाेरावरच पालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट केले.
सेनेच्या कागदी वाघांच्या जबड्यात हात घालून भाजपने शिवसेनेचे दात माेजण्याची ताकद यापूर्वीही वारंवार दाखविली असल्याचे प्रा. सुहास फरांदे यांनी नमूद केले. तर, सेना काय म्हणते याकडे दुर्लक्ष करुन महापालिकेची निवडणूक भाजप एकट्याच्या बळावर लढवून अाणि जिंकून दाखविणार असल्याचा विश्वास विजय साने यांनी व्यक्त केला. प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी यांनीही विचार व्यक्त केले.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चाैधरी यांना शाब्दिक टाेला लगावताना माजी अामदार वसंत गिते म्हणाले की, मित्रपक्षाचे बाहेरील नेते नाशिकमध्ये येऊन सत्ता स्थापनेची स्वप्न रंगवित अाहेत. माझ्या अनुभवाप्रमाणे, नाशिकची जनता सुजाण असून, चांगल्याला डाेक्यावर घेतात अाणि नालायकाला पायदळी तुडवतात. यापुढील काळात सरकारी याेजना अधिकाधिक जनतेपर्यंत पाेहोचवाव्यात, असेही अावाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सेनेने मैत्रीचा धर्मही पाळला नाही
मी परदेशात असताना अाणि सुहास फरांदे अाजारपणामुळे अायसीयूमध्ये दाखल असताना शिवसेनेसह अन्य विराेधकांनी माझ्या घराबाहेर घंटानाद अांदाेलन केले असे सांगत अामदार फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला मैत्रीचा धर्मही पाळता अाला नाही, असे त्यांनी नमूद केले. मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जाेशी यांनी सूत्रसंचालन केले.