नाशिक - भांडणाची कुरापत काढत युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मखमलाबाद राेडवरील रहिवासी तुकाराम दत्तू चोथवे आणि नीलेश नंदकुमार नेरूलकर या दाेघांना ही शिक्षा झाली असून उर्वरित चाैघांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात अाली अाहे.
मार्च २०१४ रोजी प्रवीण ऊर्फ समीर उत्तम हांडे या युवकाचा हनुमानवाडी परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास गोळी झाडून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि संशयित चाेथवे, नेरूलकर इतरांत पूर्ववैमनस्यातून वाद झाला हाेता. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले हाेते. याचा वचपा काढण्यासाठी प्रवीण त्याचा मित्र स्वप्नील आदिनाथ पवार दुचाकीवरून जात असताना चाेथवे त्याच्या साथीदारांनी रस्त्यात खाली पाडून मारहाण केली. चाेथवेने पिस्तुलाने हांडे याच्या उजव्या डोळ्याखाली गोळी झाडून खून केला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी संशयितांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. सखाेल तपासाअंती संशयितांविराेधात सबळ पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले हाेते. सदर खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांच्यासमाेर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद करून २८ साक्षीदार तपासले. मात्र, संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी अाणि दहशत यामुळे त्यातील २४ फितूर झाले. उर्वरित चार साक्षीदारांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल, पिस्तुलसह वस्तुनिष्ठ पुराव्यांवर मिसर यांनी जाेर देत गुन्हा सिद्ध केला. त्यानुसार न्यायालयाने चाेथवे नेरूलकर यांना दाेषी ठरवित जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.