आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theatrical Performance,Latest News In Divya Marathi

‘रिमझिम रिमझिम’मध्ये रसिक चिंब...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तरुणांच्या भावविश्वावर आधारलेली कथा ही केवळ तरुणांचीच नाही तर आपलीच आहे, अशी जाणीव अनेकदा करून देणारं नाटक म्हणजे ‘रिमझिम रिमझिम’. प्रेमाबरोबरच पाऊस आणि कविता याचं स्थानही जगण्यात किती समृद्ध असतं ही समृद्धताही या नाटकाने अधोरेखित केली. विशेष म्हणजे कुसुमाग्रजांनी 55 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली लघुनाटिका आजच्या काळातील तरुणांच्या नात्यांवर भाष्य करते याची जाणीव अनेकजण बोलून दाखवत होते. ‘नवविवाहित दांपत्याच्या आयुष्यात पूर्वीचा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीच्या रूपाने येणारं वादळ’, असा गंभीर विषय असला तरी मुळातच लेखक दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या संहितेतच दम असल्याने ही गंभीरता धीरतेकडे झुकली नाही हे विशेष. कारण संवाद हे साधेच होते; पण त्याचे रेखीवपण मध्येमध्ये खुसखुशीतपणा आणत असल्याने तरुणांनाच काय पण ज्येष्ठांनाही ते आपलेसं वाटत होतं.
अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या सक्षम अभिनयामुळे नाटकाने वेगळीच उंची गाठली होती. अर्थातच सहकलाकार पल्लवी कदम आणि राकेश दाते यांची साथही उत्तम होती. दिग्दर्शक प्रवीण काळोखे यांनी रंगमंचावर नाटकाची उत्तम मांडणी केल्याने आणि आजच्या तरुण पिढीला हवं तसं कसब दाखवल्याने अनेक ठिकाणी दिग्दर्शनाला तरुणांनी टाळ्या-शिट्ट्यांनी दिलेली दाद म्हणजे ‘येस धीस इज अवर्स’ हेच सांगून जात होती.
नाटकातील कवितेची पेरणी, त्यावर सुबक नृत्य आणि त्याला साजेसं संगीत ही त्याची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्या जगण्याच्या कुपीत बंद असलेली ही गोष्ट आहे, असं प्रत्येकालाच जाणवत असताना ‘आता घरी जाऊन आपलं घर गळतंय का हे तपासावं लागेल,’ असं म्हणत रसिकांनी नाटकातील ‘घर गळतंय’ हा संवाद लक्षात ठेवून स्वत:च्या भावविश्वाला त्यात गुंफून घेतलं.
रंगमंचावर पाऊस
बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतानाच रंगमंचावरही तो प्रत्यक्षात दिसल्याने रसिक प्रेक्षागारातही पावसाची अनुभूती घेत होते. खरं तर रंगमंचावर पाऊस दाखवणं हे तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड काम असतं. पण, या नाटकात तो पाऊस रंगमंचावर मोठ्या खुबीने दाखविण्यात आला. संपूर्ण नाटक संपेपर्यंत रंगमंचावर ही रिमझिम रिमझिम होत असतानाच संगीताच्या माध्यमातूनही कधी या सरी गंभीर, तर कधी अवखळ होत नाट्याकृतीला तरल साज चढवत होत्या. अनेक जुन्या रसिकांना तर रंगमंचावरील पाऊस पाहताना ‘ब्रह्मचारी’ या नाटकाची आठवण झाली. या नाटकातही छोटासा धबधबा दाखविण्याचा प्रयत्न झाला होता.