आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतील महिला चोरांवर ‘तेजस्वी’ नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-रेल्वे स्थानकावर दागिने व पाकिटे चोरणार्‍या गुन्हेगारांमध्ये महिलांची वाढती संख्या लक्षात घेत रेल्वे सुरक्षा बलाने नेमलेल्या पाच धडाकेबाज महिला पोलिसांच्या ‘तेजस्विनी’ पथकाने आतापर्यंत सुमारे सव्वातीनशे संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित होऊ शकणार आहे.

मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव आणि भुसावळ या रेल्वे स्थानकांमध्ये लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या थांबत असल्याने तेथे गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. या गर्दीचा फायदा घेत अनेक महिला चोर महिलांचे सोन्याचे दागिने लंपास करतात, तसेच पुरुषांची पाकिटेही मारतात. महिला गुन्हेगारांवर पकडून या चोर्‍यांवर नियंत्रण आणणे पुरुष कर्मचार्‍यांच्या दृष्टीने जिकिरीचे ठरले होते. दिवसेंदिवस वाढणार्‍या या चोर्‍यांना आळा बसावा म्हणून रेल्वे सुरक्षा बलाने पाच महिला पोलिसांचे स्वतंत्र असे तेजस्विनी पथक निर्माण केले. या पथकांतील महिला पोलिस रेल्वेगाडीतून साध्या वेशात प्रवास करतात. गाडी स्थानकामध्ये आल्यानंतर बसण्यासाठी घाई करणार्‍या महिलांचे दागिने व जवळचे लहान मूल पुरुष प्रवाशाकडे देत पाकिट मारणार्‍या गुन्हेगार महिलांवर त्या लक्ष ठेवतात. चोरी घडताच ताब्यात घेत गुन्हा दाखल करतात. तसेच, महिलांची छेडछाड करणार्‍यांना पकडून त्यांच्यावरही गुन्हाही दाखल करतात.

चोर्‍या झाल्या कमी
‘तेजस्विनी’ पथकामुळे रेल्वे गाड्यांमध्ये महिलांची छेडछाड व चोर्‍यांचे प्रकार कमी झाले आहेत. आतापर्यंत या पथकाने अनेकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षित प्रवास करता येत आहे. ए. के. स्वामी, असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर, भुसावळ

प्रवास करताना अशी घ्या काळजी

  • गाडीमध्ये चढताना गर्दी करणार्‍या महिलांपासून सावध राहा
  • चोरी करणार्‍या महिला करतात लहान मुलांचे भांडवल
  • प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने घालू नये
  • एकाच ठिकाणी पैसे ठेवू नयेत