आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theft News In Marathi, Vehicle Theft And Robbery Issue At Nashik, Divya Marathi

वाहनचोरी, घरफोडीच्या घटनांनी गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गत दहा दिवसांत भरदिवसा घरफोड्या, वाहनचोरी आणि महिलांचे सौभाग्याचे लेणे हिसकावून लुटमारीच्या एकूण 15 हून अधिक घटना घडल्याने पोलिस यंत्रणेचा वचक कमी होतोय की काय, असा सवाल रहिवाशांमध्ये उपस्थित होत आहे. एकीकडे पोलिस आयुक्तांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांच्या तुलनेत तब्बल 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा केला जात असताना या वाढत्या गुन्ह्यांमुळे गुन्हेगारीचा आलेख उंचावण्याची भीती व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सर्वच पक्षांमध्ये उत्साह निर्माण झालेला असतानाच, गुन्हेगारी घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. एकीकडे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना, यापूर्वीचा गुन्हेगारीचा तुलनात्मक आढावा घेतला असता, पहिल्या वर्षी 20, तर दुसर्‍या वर्षी तब्बल 30 टक्के गुन्ह्यांत घट झाली आहे. यामुळे रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच भरदिवसा एक-दोन नव्हे, तर पाच-पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर पोलिस यंत्रणेने गेल्या दोन वर्षांत जे रस्त्यावरचे गुन्हे कमी करण्यास प्राधान्य दिले, त्यात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु, आठवडाभरात दररोज कुठल्या ना कुठल्या भागात एक-दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. यामध्ये सात ते आठ लाखांचा ऐवज चोरी गेला आहे. वाहनचोरीचेही दहाहून अधिक गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांच्या गस्ती आणि नाकेबंदी देखाव्यापुरत्याच की काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हे शोध पथके नावापुरतीच पोलिस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांविरोधात थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी बहुतांशी पोलिस ठाण्यांतून ही पथके बंद केली आहेत. या कर्मचार्‍यांना गुन्हे प्रतिबंध आणि शोधासाठी दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त पुरेसा वेळ मिळत नसल्याने स्वतंत्रपणे तीन युनिट स्थापन करण्यात आले आहेत. त्यांच्याकडूनही अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले होते. मात्र, या युनिटकडूनही सद्यस्थितीत मोजक्याच हॉटेल्स, चायनीज गाड्यांवर कारवाई करण्यापलीकडे कुठलेही अवैध धंदे रोखणे, गुन्हे उघडकीस आणण्याचे काम होत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुन्हेगारांची धरपकड सुरूच
गुन्हे शोध पथकांकडूनच सराईत गुन्हेगार गणेश भंडारीच्या घरातून गावठी कट्टा व तलवार जप्त करण्यात आली असून सापळा रचून त्यास पकडण्यात आले. पोलिस मुख्यालयातील 200 कर्मचार्‍यांना सोबत घेत नाकेबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त