आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तद्वार विभाग नियमबाह्य नाहीच, तत्कालीन कार्यवाह जहागिरदार यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या मुक्तद्वार विभागावर सावानाच्या विद्यमान कार्यकारिणीने निर्णय घेत हाताेडा मारला. महापालिकेने या शेडला नियमबाह्य ठरवत नाेटीस दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले अाहे. ही शेड अजिबातच नियमबाह्य नसून, केवळ द्वेषापायी हे पाडकाम केल्याची प्रतिक्रिया देतानाच ही शेड कशी याेग्य अाहे, याचा खुलासाच तत्कालीन कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी केला अाहे. 
 
मुळातच आपली बाजू न्याय्य असताना महापालिकेकडून अन्याय होण्याची शक्यता नाही आणि समजा त्यानंतरही महापालिकेने काही कार्यवाही करण्याचे ठरविलेच तर महापालिकेच्या नोटिसीविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. सावानाच्या पॅनलवर नामवंत वकील आहेत आणि ते सावानाच्या प्रेमाखातर अतिशय माफक फीमध्ये काम करण्यास तयार असतात. 
 
विनयराज तळेकरांसारख्या वकिलांनी तर सावानाकडून आजपर्यंत एक रुपयासुद्धा मानधन घेतलेले नाही. तरीही त्यांचा सल्ला घेतला गेला नाही आणि महानगरपालिकेच्या नोटिसीचा प्रतिवाद केला गेला नाही. शेड काढण्याअगोदर सावानाच्या वास्तुविशारदांचा सल्लासुद्धा घेतला गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. 
 
आम्ही संस्थेचे तीस हजार रुपये वाचविले, असे संस्थेचे अध्यक्ष सांगतात. पण, संस्थेचे तीस हजार रुपये खर्च होणारच नव्हते. पण, आज शेड उतरविण्यासाठी लागणारा खर्चसुद्धा करण्याची गरज नव्हती. 

वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संस्थेचे नुकसान कसे होणार नाही, असाच प्रयत्न असावा. पण, संस्थेचे पैसे अशा विध्वंसक कामासाठी खर्च करणे योग्य नाही. जर एक साधी शेड हे लोक वाचवू शकत नसतील तर ते संस्था सक्षमतेने कसे चालविणार असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, असेही जहागिरदार यांनी म्हटले अाहे. 
 
मुक्तद्वार विभागाबाबत... 
-सावानाचीमुक्तद्वार विभागाची शेड ही मुळीच नियमबाह्य नाही. 
- तात्पुरते शेड आहे. त्यामुळे बांधकाम हा शब्द योग्य नाही. 
- सावानाच्या पॅनलवर नामवंत वास्तुविशारद आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानेच शेड उभारण्यात आले. 
- पालिकेची नोटीस आली होती, परंतु, पालिकेतून आलेली प्रत्येक नोटीस कायदेशीरच असते असे नाही. किंबहुना अशी नोटीस खरी-खोटी तक्रार करूनही घेता येते. 
- महानगरपालिकेतील अधिकारी हे वाईट नाहीत, चांगलेच आहेत आणि त्यांचे सावानावर प्रेमसुद्धा आहे. त्यांना भेटून खरी परिस्थिती अवगत करवून नोटीस रद्द करवून घेणे आवश्यक होते आणि तसे मी स्वत: सावानाच्या आजच्या तथाकथित पदाधिकाऱ्यांना सुचविलेसुद्धा होते. परंतु, सावानाकडून त्यासंबंधी काहीही कार्यवाही झाली नाही.
- कर्नल देशपांडे महापालिकेच्या ज्या अंतिम नोटिसीचा हवाला देत आहेत ती अंतिम नोटीस दिनांक २२ नाेव्हेंबर २०१६ ची आहे. आणि त्यानंतरच मी स्वत: आणि सुरेश गायधनी अशा दोघांनी वास्तुविशारदांच्या सल्ल्याने महानगरपालिकेत जाऊन त्यांना योग्य ते सर्व कागदपत्रे देऊन शेडच्या ऐवजी पक्के बांधकाम करण्याची कार्यवाही पुढे सुरू करून घेतली आहे. तीही पालिकेत जाऊन स्वत: घुगे साहेबांना भेटून. 
- त्यामुळे दिनांक २२ नाेव्हेंबरनंतर महापालिकेकडून काहीही कार्यवाही झालेली नाही आणि होण्याची शक्यताही नाही. 
बातम्या आणखी आहेत...