आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीचा नवा फंडा : दरवाजा वाजवा अन‌् साेने पळवा, महिलावर्ग भयभीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरानगर - दुचाकीवरून येत सोनसाखळी हिसकावणे, बाेलण्यात गुंतवून दागिने पळवणे यासारख्या प्रकारांमुळे शहरातील महिलावर्ग कमालीचा भयभीत झालेला असतानाच आता चाेरांनी थेट घराची बेल वाजवत दार उघडणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा नवीन फंडा शाेेधून काढला अाहे.
 
दुपारी घरी राहणाऱ्या समस्त महिला, ज्येष्ठ नागरिकांना सावधानतेची जाणीव करून देणारा हा धाडसी प्रकार शुक्रवारी (दि. १) इंदिरानगरातील गजरा पार्कमध्ये घडला. महिलेने सतर्कता दाखवत चपळाईने दरवाजा बंद केल्यामुळे चोराचे बोट दरवाजात सापडून तो जखमी झाला अाणि घाबरून पळून गेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

जयश्री पाटील (गजरा पार्क ३, फ्लॅट नं. ५) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अतुल पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला होता. त्यामुळे घरी पाटील एकट्याच होत्या. मुलगा गेल्यानंतर काही वेळाने दाराची बेल वाजल्याने पाटील यांनी दरवाजा उघडला. ताेच समोरच्या व्यक्तीने पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी जाेर लावून तत्काळ दरवाजा बंद केला. संशयिताने दरवाजा पुन्हा लाेटण्याचा प्रयत्न केल्याने पाटील यांनी अाणखी जाेर लावला. या झटापटीत दरवाजाच्या फटीत बोट सापडून चाेरटा जखमी झाला घाबरून पळून गेला.

तोपर्यंत पाटील यांनीही दरवाजा पूर्णपणे बंद केल्याने गंभीर प्रकार टळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील सुन्न झाल्या. थाेड्या वेळाने सावरल्यावर त्यांनी मुलास या प्रकाराची कल्पना दिली.गुरुवारीच (दि. ३१) पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. अाता चाेर घरात घुसून साेनसाखळी चाेरण्याची हिंमत दाखवू लागल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी गजरा पार्क परिसरातच अॅक्टिवावरील एका संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली होती. त्या गुन्ह्याचा शोध सुरू असताना चोरट्यांनी हा नवा फंडा वापरला. 

महिलांना मारण्यापर्यंत चाेरांची मजल 
मुली-महिलांनामारहाणकरण्यापर्यंत सोनसाखळी चोरांची मजल गेली आहे. आतातर थेट घरात घुसून सोनसाखळी चोरीचा प्रयत्न झाल्याने चोरांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नसल्याने दिसत अाहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. 
- हर्षद गोखले, शिवसेनाग्राहक कक्ष प्रमुख 
 
चोरीच्या स्पॉटवर नाकेबंदीचा अभाव 
इंदिरानगर परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी पोलिसांकडून गस्त आणि नाकेबंदीचा अभाव दिसून येत आहे. 

दिव्य मराठी अलर्ट 
- घराची बेल अचानक कोणी वाजवली तर प्रथम खिडकी अथवा विंडो मिररमधून पाहून बाहेरील व्यक्ती ओळखीची असल्याची खात्री झाल्यानंतरच दरवाजा उघडा. 
- सोसायटी, रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर लक्ष ठेवा. 
- शक्य झाल्यास घराच्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावा. 
- रस्त्याने पायी एकटे जाता कुणाला तरी सोबत घ्या. 
- अनाेळखी व्यक्ती पत्ता विचारत असल्यास सावध व्हा.
- निर्जनस्थळी सोन्याची अाभूषणे घालून जाऊ नका. 
बातम्या आणखी आहेत...