आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणुकीसाठी ‘आंबेडकरवादी आघाडी’ सर्व अांबेडकरी विचारगटांची एकी; बैठकीत निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : सर्व आंबेडकरी विचारांचे पक्ष, गट आणि संघटनांनी एकत्र येऊन ‘आंबेडकरवादी रिपब्लिकन आघाडी, नाशिक’ नावाने नवी आघाडी स्थापन केली आहे. याच आघाडीअंतर्गत महापालिका निवडणूक लढविण्यात येणार असून, पाचही विभागांत बैठका, सभा घेत १० जानेवारीपासून उमेदवारी अर्जांचेही वाटप करण्याचा एकमुखी निर्णय रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. 
 
विविध गटातटांत, पक्षांत आणि संघटनांमध्ये आंबेडकरी समाज विभागला गेल्याने निवडणुकांमध्येही अपेक्षित यश मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर समाजाची आणि मतदारांची संख्या असतानाही सभागृहात प्रतिनिधी निवडून जात नसल्याने सत्तेत सहभागीच होत नाही. त्यामुळेच समाजालाही न्याय देता येत नाही. परंतु, सर्वच एकत्र आल्यास चित्र निश्चितच बदलू शकते, याची प्रचिती नुकतीच नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या दलित, बहुजन महामोर्चातून आली. 
 
त्यानंतर लगेचच गटातटांत विभागलेल्या सर्वच स्थानिक राजकारण्यांनी एकत्र येत कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढविता आघाडी स्थापन करून त्याअंतर्गतच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या बैठकीत आघाडीच्या नामकरणावर तास-दोन तास ऊहापोह करण्यात आल्यानंतर तब्बल १२ ते १५ नावांमधून ‘आंबेडकरवादी रिपब्लिकन आघाडी, नाशिक’ या नावावर एकमत होत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
 
आघाडीच्या बैठकीत सर्वच आंबेडकरी विचाराच्या पक्षांचे, गटांचे, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात १९ नोव्हेंबरच्या मोर्चाला समाजबांधवांनी दिलेल्या प्रतिसादाप्रमाणेच कुठेही मतांची विभागणी होता या आघाडीलाही निवडणुकीत प्रतिसाद कसा मिळेल, यासाठी उपस्थित सर्वच प्रतिनिधींनी विचार मांडत तसे नियोजनही करण्यास सुरुवात केली आहे. 
 
बैठकीस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय दलित पँथरचे अध्यक्ष नानासाहेब भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशिकांत उन्हवणे, रिपाइं गवई गटाचे भारत पुजारी, एकतावादी रिपाइंचे आदेश पगारे, भारिपचे दीपचंद दोंदे, स्वारिपचे सिद्धार्थ भालेराव, दलित पँथरचे ढसाळ गटाचे भिराज जाधव, विलास काळे, दलित सेनेचे बाळासाहेब मोकळ, रिपब्लिकन सेनेचे नवीन नन्नावरे, दलित आदिवासी आघाडीचे अनिल आठवले, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे रवि जगताप, रवि मोकळ, बहुजन भीम सेनेचे संजय खरात, भारतीय बहुजन सेनेचे डॉ. प्रशांत घोडेराव, दलित विकास महासंघाचे कैलास तेलोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर सर्वच गटांचे, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
सर्वच संघटनांचा सन्मानपूर्वक सहभाग होणार 
‘आंबेडकरवादी रिपब्लिकन आघाडी, नाशिक’मध्ये रिपाइंसह आंबेडकरी विचारांचे सर्वच पक्ष, गटांचा सहभाग झाला आहे. त्याचबरोबर मातंग समाज, चर्मकार समाज, आदिवासी, वाल्मीकी मेहतर, मेघवाल समाज, भटके विमुक्त या समाजाच्या संघटनांना आघाडीत सन्मानपूर्वक सहभागी करून घेतले जात असून, मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील संघटनांनाही सहभागी करून घेतले जाणार असून, तसा निर्णय देखील झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...