आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is Not Expected To Me, Batminton Player Pradyna Say

‘एवढय़ा मोठय़ा बोलीची मला अपेक्षाच नव्हती’, बॅडमिंटनपटू प्रज्ञा गद्रेची प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘माझ्यासाठी इतकी मोठी बोली लागेल, अशी खरं तर अपेक्षाच नव्हती,’ अशा प्रतिक्रिया नाशिकच्या प्रज्ञा गद्रे हिने इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये (आयबीएल) लाभलेल्या असाधारण प्रतिसादाबद्दल ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. ऑलिंपिक रिटर्न ‘ग्लॅमडॉल’ ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पापेक्षाही अधिक बोली प्रज्ञाला लागल्याने नाशिककर बॅडमिंटनप्रेमींना आनंद झाला आहे. मूळची नागपूरची मात्र नाशकातच बॅडमिंटनचे पहिले धडे गिरविलेल्या प्रज्ञाने अवघ्या दशकभरात मारलेल्या या भरारीमुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सोमवारी प्रज्ञासाठी हैदराबाद हॉटशॉट्स या संघाने तब्बल 46 हजार डॉलर अर्थात 27 लाख रुपयांची बोली लावली. बॅडमिंटन सुपरस्टार सायना नेहवाल (एक लाख 20 हजार डॉलर) व पी. सिंधू (80 हजार डॉलर) या महिला एकेरीच्या दिग्गजांपाठोपाठ भारतीय मुलींमध्ये सर्वाधिक रक्कम प्रज्ञाला प्राप्त झाली आहे. या लीगचे सामने 14 ऑगस्टपासून होणार असले तरी त्याआधी होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सध्या तयारी करीत असल्याचे प्रज्ञाने नमूद केले. ती स्पर्धा झाल्यानंतरच इंडियन लीगवर लक्ष केंद्रित करणार आहे, असे ती म्हणाली.


नाशकात फुलले प्रज्ञावान करिअर
22 वर्षांच्या प्रज्ञाचे बालपण नागपूरला गेले. तेथे ती प्रिया देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन शिकत होती. मात्र, वडिलांची बदली झाल्याने कुटुंबासहित 2002 मध्ये ती नाशिकला आली. प्रशिक्षक मकरंद देव यांच्याकडे तिने बॅडमिंटनचे पुढील धडे गिरवले. पाच वर्षांपूर्वी पुण्याला पुढील प्रशिक्षणासाठी रवाना झाली. रवी कुंटे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. संधी मिळताच तिने पुलेला गोपीचंद यांच्या हैदराबाद येथील अकॅडमीत प्रवेश मिळवत कसून सराव केला.


सायनासमवेत संधीचा आनंद
हैदराबाद हॉटशॉट्स’कडून सायना नेहवाल व तौफीक हिदायत यांच्यासमवेत खेळण्याची संधी मिळणार असल्याने त्याचादेखील आनंद आहे. तसेच, अनेक परदेशी खेळाडूंबरोबर इंटरअँक्ट करायला मिळण्याचा करिअरसाठी नक्कीच फायदा होईल. प्रज्ञा गद्रे, बॅडमिंटनपटू


ऑलिंपिकनंतर खुलले नशीब
ऑलिंपिकपूर्वी महाराष्ट्राच्याच प्राजक्ता सावंतबरोबर दुहेरीत खेळणार्‍या प्रज्ञाचे नशीब लंडन ऑलिंपिकनंतर खुलले. त्यानंतर ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा ही आघाडीची जोडी वेगळी झाल्यानंतर अश्विनीने प्रज्ञाचा खेळ पाहून तिची दुहेरीतील साथीदार म्हणून निवड केली. त्यांनी इंडोनेशियातील सुदीरामन चषकात इंडोनेशियन प्रतिस्पध्र्यांना 19-21 आणि 20 -22 अशी कडवी झुंज दिली. त्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही प्रज्ञा हीच आपली जोडीदार राहणार असल्याचे अश्विनीने जाहीर केले असल्याने भारताकडून भविष्यातील सर्व दुहेरीचे सामने ती अश्विनीबरोबर खेळणार आहे.