आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो भाविक निवृत्तिनाथांच्या चरणी लीन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर - भल्या पहाटे कुशावर्तात स्नान करून दोन लाखावर वारकरी व भाविकांनी संत निवृत्तिनाथांचे दर्शन केले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून 500 ते 600 दिंड्या व खासगी वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाले आहे. त्यामुळे भल्या पहाटेपासूनच कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी गर्दी होती. संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. दिंड्यांच्या ठिकाणी सुरू असलेल्या टाळमृदंगाच्या गजराने ब्रह्मगिरी दुमदुमून गेली होती. महादेव मंदिर, जव्हारफाटा यांसह त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, संत निवृत्तिनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
गुरुवारी पहाटे संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या वतीने जयंत महाराज व भानुदास महाराज गोसावी यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात्रेत प्रसाद साहित्य, ग्रंथ, पोथ्या, तुळशीमाळा, मूर्ती, प्रतिमा यासह खजूर, केळी, साबुदाणे, शेंगदाणे या फराळाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. पालिकेने पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा केला आहे तर पोलिसांनी जादा कुमक ठेवून बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामीण आरोग्य विभागातर्फे महत्त्वाच्या ठिकाणी प्रथमोपचाराची सोय करण्यात आली होती. परिवहन महामंडळातर्फे भाविकांसाठी दर दहा मिनिटांनी बस सोडण्यात येत होती. यासाठी 275 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त गर्दीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आला होता.
अरुंद जागेमुळे अडचण - शहरातील महाजन चौकात दोन-तीन बाजूंचे रस्ते मिळत असल्याने व ती जागा अरुंद असल्यामुळे येथे गोंधळ उडत होता.
पालखी मिरवणूक - गुरूवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान श्रींचा चांदीचा मुखवटा व पादुका ठेऊन पालखी रथात ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, भानुदास गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, जयंत महाराज गोसावी यांच्यासह परंपरेच्या दिंडयांचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते.जवळपास तीन तास ही मिरवणूक मिरवणूक चालली.