आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादीतील गोंधळाने हजाराे मतदारांच्या हक्कावर गदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळालीगावातील आठवडे बाजार शाळा मतदान केंद्रात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक अशी गर्दी झाल्याने गाेंधळ उडाला. - Divya Marathi
देवळालीगावातील आठवडे बाजार शाळा मतदान केंद्रात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक अशी गर्दी झाल्याने गाेंधळ उडाला.
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीतील प्रचंड गाेंधळामुळे मंगळवारी शहरातील विविध प्रभागांमध्ये हजाराे मतदारांवर त्यांच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ अाली. मतदार यादीतून नावेच गायब असणे, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शवणे, कुटुंबातील काही सदस्यांची नावे व फाेटाेचा पत्ताच नसणे यापासून तर थेट मृत व्यक्तीच्या नावे बाेगस मतदान करणे असे प्रकार घडल्याने मतदार संतप्त झाले. 

म्हसरूळ येथे या गाेंधळाने टाेकच गाठले. तब्बल दीड हजाराच्यावर  नावे मतदार यादीतून गायब झाल्याने नागरिकांनी रुद्रावतार धारण करत रास्ता राेकाे केला. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक अायाेगाच्या अादेशानुसार शहरात मतदार जागृती अभियान राबविण्यात अाले हाेते. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच या माेहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून अाले. 

मतदारांचे हाल ; उमेदवारांची धावपळ
मतदार यादीतील गाेंधळामुळे अनेकांचा मनस्ताप झाला. प्रामुख्याने घराजवळील मतदान केंद्रांवर मतदान अपेक्षित हाेते. त्यानुसार कुटुंब बाहेर पडल्यावर पतीचे नाव एका टाेकाला, तर पत्नीचे दुसऱ्या टाेकाला असे विचित्र अनुभव अाले. त्यामुळे अनेकांनी मतदान न करताच घरचा रस्ता धरला. अशा मतदारांची मनधरणी करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली. गाडी देताे, परंतु, मतदान करा असा हट्ट धरत अनेकांना मनवण्याचे प्रयत्न झाले.
 
सातपूरला मृत इसमाच्या नावावर मतदान, अानंदवल्ली, श्रमिकनगरमधील मतदारांची नावे गायब
सातपूर विभागातील राधाकृष्णनगर येथील मतदान केंद्रावर बाेगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस अाला. या केंद्रावर मृत व्यक्तीच्या नावावर अन्य व्यक्तीने बाेगस मतदान केल्याची बाब उघडकीस अाली अाहे, तर सातपूर, श्रमिकनगर, अानंदवल्ली, गंगापूर भागातील मतदारांची नावे यादीत अाढळून न अाल्याने गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
 
अशाेकनगर येथील राधाकृष्णनगरमधील मनपा शाळा क्रमांक ७५ मधील बूथ क्रमांक १६ मध्ये  उषा भाऊसाहेब अभंग ही महिला मतदानास गेली असता नावात बदल असल्यामुळे त्यांना मतदानापासून राेखण्यात अाले. यावेळी बूथवरील यादीत त्यांचे नाव शाेधले असता त्यांच्या पतीच्या नावावर अन्य व्यक्तीने मतदान केल्याची बाब उघडकीस अाली.
 
उषा अभंग यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले अाहे. ही बाब त्यांनी मतदान केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास अाणल्यानंतर हे मतदान रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी ताेंडी अाश्वासन दिले. मात्र, एकदा झालेले मतदान रद्द करण्याची काेणतीही तरतूद नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. त्याचप्रमाणे अनेक मतदारांचे मतदान यादीत नाव न सापडल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. विशेष म्हणजे शिवाजीनगर भागातील रहिवाशांची नावे थेट सातपूर काॅलनीत, तर श्रमिकनगर रहिवाशांचे नावे गंगापूरराेड भागात असल्याचे अाढळून अाले अाहे.
 
पंचवटीतील कृष्णनगरमध्ये दाेन जणांच्या नावावर बाेगस मतदानाचा प्रकार
पंचवटीतील अाडगावनाक्यावरील कृष्णनगर व्यायामशाळा या मतदान केंद्रात दुपारी अडीचच्या सुमारास वनिता कैलास खैरे ही महिला मतदानासाठी केली असता त्यांच्या नावावर अगाेदरच मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस अाला. याबाबत त्यांनी संबंधित केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. संबंधित बाेगस मतदाराने जी स्वाक्षरी केली हाेती, त्याचे छायाचित्र वनिता खैरे यांना काढण्याची परवानगी दिली. कैलास खैरे यांनी संबंधित बाेगस सही केलेल्या महिलेने जी सही केली हाेती, त्या सहीचे माेबाइलमध्ये छायाचित्रही काढले. याबाबत कैलास खैरे यांनी मनपा अायुक्तांकडे रितसर तक्रार करणार असल्याचे सांगितले. असाच प्रकार शेजारीलच नर्गिस दत्त कन्या विद्यालयातही घडला. याठिकाणीही माेठा तणाव निर्माण झाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...