आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळखाऊ परीक्षा पद्धतीत एकसूत्रीपणाची गरज...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुक्त विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाचे सहायक प्रा. सज्जन थूल यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून डॉ. अमरेंद्र पाणी, डॉ. राम ताकवले, प्रा. फुरकान कमर, डॉ. सज्जन थूल, प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. प्रकाश अतकरे डॉ. सुरेश पाटील.)
नाशिक- बदलत्या काळात गुणवंत विद्यार्थी कौशल्ये घेऊन बाहेर पडला पाहिजे. सर्व विद्यापीठांत व्यक्तींवर अवलंबून असलेली वेळखाऊ परीक्षा पद्धत असून, त्यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा पद्धतीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. भारतात शिक्षकांवर विश्वास ठेवणारी गुरूकुल पद्धत अस्तित्वात होती. कालांतराने ब्रिटिश राजसत्तेमुळे हा विश्वास नाहीसा झाल्याने ती बदलण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय विद्यापीठ संघाचे महासचिव प्रा. फुरकान कमर यांनी केले.
भारतीय विद्यापीठ संघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘परीक्षा सुधार’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय कृतिसत्राच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय विद्यापीठ संघाचे महासचिव प्रा. फुरकान कमर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, भारतीय विद्यापीठ संघाच्या संशोधन विभागाचे उपसंचालक डॉ. अमरेंद्र पाणी, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे आणि कृतिसत्राचे मुख्य समन्वयक डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
प्रा. कमर म्हणाले, परीक्षा पद्धतीतील सुधाराबाबत १९७० पासून देशभरातील सर्व विद्यापीठांत भारतीय विद्यापीठ संघ कृतिसत्र आयोजित करते. पुढील काळात परीक्षा पद्धतीतील सुधाराबाबतच्या शिफारशींची विद्यापीठांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, मुक्त विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऑनलाइन प्रवेश आणि ऑनलाइन परीक्षा पद्धत सुरू केली अाहे. डॉ. राम ताकवले यांनी रोजगारासह नवनिर्मितीही करता येईल, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करून त्यानुसार परीक्षांची रचना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले, तर डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले.
३५ विद्यापीठांतील परीक्षा नियंत्रक सहभागी
तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय कृतिसत्रात १० शिक्षणतज्ज्ञांसह देशभरातील ३५ विद्यापीठांतील परीक्षा नियंत्रक, कुलसचिव, ज्येष्ठ प्राध्यापक आदी सहभागी झाले आहेत. बदलत्या काळातील मूल्यमापन पद्धती, अंतर्गत आणि अंतिम मूल्यमापन, श्रेयांकांतरणावर आधारित मूल्यमापन पद्धती आणि श्रेयांकांतरण, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन, मागणीनुसार परीक्षेतील उपयुक्तता, आदर्श मूल्यमापन पद्धती, तंत्रज्ञानावर आधारित मूल्यमापन पद्धती या विषयांवर नामवंत तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. त्यात विशेषतः एमकेसीएलचे अमित रानडे, प्रा. उषा नेगी, तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजित थेटे, डॉ. एन. बी. ठक्कर, मधुकर शेणाॅय आदी सहभागी होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...