आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतूला लागेना मुहूर्त, नाशिक शहर-ग्रामीण भागासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सेतूच्या ठेक्याची मुदत संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्यापही नवीन ठेकेदाराची नेमणूक झाली नसून, त्याच्या नेमणुकीच्या फाइलवर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐनवेळी नागरिक आणि विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा आणि शहरासाठीच्या सेतूच्या ठेक्याची मुदत संपून तीन महिने उलटले आहेत. शिवाय, राज्यभर सर्वच प्रकारच्या दाखल्यांचा एकच फॉर्मेट राहावा, यासाठी हे काम महाऑनलाइनच्या माध्यमातून राज्यभर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येक सेतूचे स्वतंत्र सॉफ्टवेअर ठेवता महाऑनलाइनचेच सॉफ्टवेअर त्यांना बंधनकारक करण्यात आले. परंतु, नाशिकच्या सेतू कार्यालयाच्या ठेक्याची मुदत संपली असल्याने त्यांना हे सॉफ्टवेअर देणे शक्य नाही. इतर जिल्ह्यात महाअॉनलाइनचे काम सुरू झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात सेतूसाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु, नाशिक शहर आणि ग्रामीणसाठी कसेबसे तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यामुळे याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली. आता त्यांची कमर्शिअल आणि तांत्रिक बीडही पूर्ण होत तपासणीही करण्यात आली आहे. त्याची फाइलही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आता त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरच नाशिक शहर आणि तालुक्यातील नवीन सेतूधारक आपले काम सुरू करणार आहे.
परंतु, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांची या फाइलवर स्वाक्षरीच झालेली नसल्याने जुन्याच सेतू ठेकेदाराकडून दाखले वितरित केले गेले आहेत. मात्र, जुना ठेकेदार नव्याने ठेका घेणार नसल्याने तसेच दाखले वितरणाचेही काम आता त्याच्याकडे कायम राहाणार नसल्याने तेवढ्या अपेक्षेने तो हे काम करत नाही. त्याचा परिणाम ऐनवेळी शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे अवघ्या वीस दिवसांत नवीन ठेकेदार नेमून त्यास महाऑनलाइन सॉफ्टवेअरची जोड देण्यात आणि त्यानुसार वेगाने दाखले वितरण करणे कितपत शक्य आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

ग्रामीणसाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध
नाशिक शहर आणि ग्रामीणसाठी तीन निविदाधारकांनी प्रक्रियेत भाग घेतल्याने कमीत कमी शहर-तालुक्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, ग्रामीणमध्ये उर्वरित १४ तालुक्यांसाठी निविदाधारक पुढे येत नसल्याने ही प्रक्रिया अद्याप पूर्णच होऊ शकली नाही. आता नव्याने पुन्हा निविदा काढण्यात आल्या असून, त्या भरण्याची मुदत २० मेपर्यंत आहे. त्यानंतर पुढे ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे तीही हा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्षात किती दिवसांत कार्यरत होते, विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळतील की नाही, याबाबतही साशंकताच आहे.
२० मेपर्यंत निविदेसाठी मुदत
- नाशिक शहर आणि तालुक्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फाइल जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीसाठी ठेवण्यात येणार आहे. तर, १४ तालुक्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, २० मेपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. लवकरच सेतूचे काम सुरू केले जाईल.
नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...