आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोतया पत्रकाराकडून चोरीची तीन वाहने, बनावट आेळखपत्रे जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- भद्रकाली पोलिसांनी एका तोतया पत्रकाराचा पर्दाफाश करीत त्याच्याकडून स्कॉर्पिओ, इंडिका व्हिस्टा मोटारसायकल अशी सुमारे १४ लाख रुपये किमतीची तीन वाहने हस्तगत केली. दरम्यान, या तोतयाने विविध शासकीय कार्यालयांची बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. तोतयाकडून चंद्रिका टाइम टीव्ही चॅनलचे ओळखपत्रही पोलिसांनी हस्तगत केले.
गंजमाळ परिसरातून काही दिवसांपूर्वी हिरोहोंडा मोटासायकल (एमएच १५ एसी ०४७४) चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना शुक्रवारी सकाळी दूध बाजारात सराईत गुन्हेगार येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून पल्सर मोटारसायकल (एमएच ०२ बीई १४३) वरून जाणारा अमन ऊर्फ अबुजर अबुल कलाम देशमुख (३०, रा. अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, हिरावाडी) यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पल्सर मोटारसायकल कांदिवली येथून चाेरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने पंचवटी परिसरातून स्कॉर्पिओ (एमएच १५ सीएम ८०५६) इंडिका व्हिस्टा (एमएम ०८ आर ६०६९) चोरल्याची कबुली दिली. तसेच चंद्रिका टाइम टीव्ही चॅनलच्या ओळखपत्रासह राज्य शासनाच्या नाशिक विभागाचे असिस्टंट इंजिनिअर, मेडिकल ऑफिसर असे बनावट ओळखपत्रही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन उपायुक्त अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक वाल्मीक पाटील, हवालदार वाळू लभडे, विजय लोंढे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
तोतयाने केली अशीही हिंमत
पंचवटी परिसरातूनच चोरी केलेली स्कॉर्पिओ इंडिका व्हिस्टा क्रमांक बदलून त्याच परिसरात सर्रासपणे वापरत होता. अगदी राहत्या घरापासून २०० मीटर अंतरावरील चोरलेली व्हिस्टा त्याच भागात वापरत होता.
वाहनांवरील प्रेस, पोलिस नावांवर कारवाई करणार
- दुचाकी, चारचाकी वाहनांवर प्रेस, पोलिस अशा नावांचे स्टिकर लावण्यात येतात. तसेच वाहतूक शाखेचे लाेगाेही दुचाकी, चारचाकी वाहनावर टाकून एकप्रकारे पोलिस यंत्रणेवरच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाताे. वाहनांवर अशी नावे टाकणाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाईल.
अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त
बातम्या आणखी आहेत...