आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार बसेसची सेवा पर्वणीकाळात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा काळात बससाठी तत्काळ डिझेल उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाने भाविक मार्गावरील पेट्रोल पंपचालकांशी तीन दिवसांचा प्रासंगिक करार केला अाहे. एसटी महामंडळाच्या सुमारे तीन हजार बस सिंहस्थ पर्वणीकाळात विविध मार्गांवर सेवा देणार आहेत.
सिंहस्थात पोलिस यंत्रणेनंतर सर्वाधिक मोठी जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. त्यामुळे एसटी मंडळाने प्रवासी वाहतुकीचे नियोजन पूर्ण केल्याचे अधिकाऱ्यांनी नुकतेच सांगितले. शहर आणि ग्रामीण भागात दोन ठिकाणी कुंभमेळा होत असल्याने तीन हजार बसद्वारे प्रवासी सेवा पुरवण्यात येणार असून, त्यासाठीचे सर्व नियाेजन पूर्ण झाले अाहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी काही मार्ग बंद केले आहेत.

यामध्ये पर्यायी मार्ग केवळ पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वापरता येणार आहेत. बसमध्ये इंधन भरण्यासाठी बस आगारात पंप आहेत. मात्र, पर्वणीकाळात रस्ते बंद असल्याने बसेस शहरात येणार नाहीत. यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक मार्गावरील पेट्रोलपंपाशी तीन दिवसांचा प्रासंगिक करार केला आहे. याबाबतचे सर्व नियोजन जवळपास पूर्ण झाले अाहे. पर्वणीकाळात किती भाविक येतील, याचा अंदाज नसल्याने नियोजनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

असे अाहे नियाेजन
रस्तेबंद असल्याने विविध मार्गांवर डिझेल भरण्याची व्यवस्था
शहर, ग्रामीण पाेलिसांकडून काही मार्ग बंद
पर्यायी मार्ग केवळ पाेलिस अाणि अधिकाऱ्यांसाठीच
या मार्गांवर होणार डिझेल करार
धुळे,औरंगाबाद, पुणे, मुंबई-आग्रारोड, पेठ धरमपूर, घोटी, गिरणारे, दिंडोरीरोड, पेठरोड, या मार्गावरील पंपांसोबत तीन दिवसांचा करार केला आहे.